मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी त्यांना पोलिसांनी दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीत अजिबात तथ्य नाही, त्या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर  खासदर नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यामुळे पोलिसांनी आपणास वाईट वागणूक दिली, अशी तक्रार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून केली. मात्र खासदार नवनीत यांचे आरोप गृहमंत्री वळसे यांनी फेटाळून लावले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंगळवारी माध्यमांशी बोलताना, राणा यांच्या आरोपाकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यात काहीही तथ्य आढळले नाही, तरीसुद्धा लोकसभा सभापतींनी  माहिती मागवली आहे तर ती माहिती त्यांना देण्यात येईल.

बदनामीचा डाव : तपासे 

आपण मागसवर्गीय असल्याने पोलिसांनी वाईट वागणूक दिली, असा आरोप करून मुंबई पोलीस दलाला बदनाम करायचे, अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा नवनीत राणा यांचा डाव होता, असा आरोप प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

सोमय्यांना आवरा : अतुल लोंढे

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून त्यांची दंडेलशाही राज्य सरकारने खपवून घेऊ नये, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी्र  प्रदेश काँग्रेसचे  सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.  सोमय्या यांनी आजपर्यंत केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. केवळ सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राज्यात अराजक माजवण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप लोंढे यांनी केला आहे.

औरंगाबादच्या सभेचा निर्णय आयुक्तांकडे

औरंगाबाद येथे १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र त्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा करून औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक दोन दिवसात योग्य तो निर्णय घेतील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

राणा दाम्पत्याचे पोलीस ठाण्यातील चित्रीकरण आयुक्तांकडून समाजमाध्यमांवर

कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिले नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांची एक चित्रफीत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केली आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असल्याचे दिसत आहे. पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आले नाही. शौचालयात जाऊ दिले नाही, असे आरोप खासदार नवनीत राणा यांनी केले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. त्यानंतर गृह मंत्रालयाने राज्य सरकारला अहवाल देण्यास सांगतले. या घडामोडी सुरू असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याची एक चित्रफीत ट्वीट केली आहे. बारा सेकंदाच्या या चित्रफितीत राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहेत. त्यामुळे आणखी काही सांगायची गरज आहे का? असा प्रश्न संजय पांडे यांनी यावेळी ट्वीटरवर विचारला आहे.

मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केलेली चित्रफीत खार पोलीस ठाण्यातील आहे. पण अपमानास्पद वागणूक खार नव्हे तर सांताक्रूझ पोलील ठाण्यातील लॉकअप बाबत असल्याचे स्पष्टीकरण राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी केले आहे. नवनीत राणा यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यातही चांगली वागणूक दिल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यासंबंधी एक चित्रफीत प्रसिद्ध करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.