स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटांनंतर जलसमाधी मिळालेल्या ‘आयएनएस सिंधुरक्षक’पाठोपाठ नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा सातत्याने अपघातग्रस्त होण्याची मालिका सुरूच असल्याचा धक्कादायक प्रत्यय बुधवारी आला. बुधवारी पहाटे ६.००च्या सुमारास मुंबईपासून सुमारे ५० सागरी मैल अंतरावर ‘आयएनएस सिंधुरत्न’ या रशियन बनावटीच्या किलो वर्गातील पाणबुडीमधून अचानक धूर येऊ लागला आणि त्यावर तैनात ९४ जणांच्या जीवावरच बेतले. या धुरामुळे सात जण जखमी झाले असून बेपत्ता असलेले दोघे दगावल्याची भीती आहे. नौदलातील या वारंवार घडत असलेल्या दुर्घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी दिलेला राजीनामा केंद्र सरकारने तेवढय़ाच त्वरेने स्वीकारला आहे.
पाणबुडी असते तरी कशी?
दुर्घटना घडली त्यावेळेस पाणबुडीमध्ये असलेल्या ९४ जणांमध्ये नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयाच्या पाणबुडी विभागाचे प्रमुख कमोडर एस. आर. कपूर यांचाही समावेश आहे. आगीनंतर धुरामुळे गुदमरलेल्या सात जणांना हेलिकॉप्टरद्वारे ‘आयएनएस अश्विनी’ रुग्णालयात हलविण्यात आले. तर अन्य ८५ जण सुखरूप असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
नौदल सूत्रांनुसार, २०१३च्या डिसेंबर महिन्यात ‘आयएनएस सिंधुरत्न’ची दुरुस्ती आणि डागडुजी पूर्ण झाली व तिच्या कार्यक्षमतेच्या दोन चाचण्याही पूर्ण झाल्या. सध्या तिच्या सागरी चाचण्या सुरू असून त्याच्या पाहणीसाठी सुमारे २० निरीक्षकांचा एक गट या पाणबुडीवर कार्यरत होता. त्यावेळीच ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेनंतर मुंबईच्या नौदल गोदीतील सर्व प्रमुख युद्धनौका आणि एक पाणबुडी घटनास्थळी रवाना झाली. त्या विभागातील धूर बाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर पाणबुडीही हळूहळू नौदल गोदीमध्ये आणण्याचे काम सुरू आहे.
गेल्या सात महिन्यांमध्ये नौदलातील पाणबुडी व युद्धनौकांना झालेला हा दहावा अपघात आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीमध्ये क्षेपणास्त्रांचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये १८ नौसैनिकांना प्राण गमावावे लागले होते. त्या दुर्घटनेनंतर जलसमाधी मिळालेली सिंधुरक्षक बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या नौदल गोदीमध्ये सुरू आहेत. त्यानंतर गेल्याच महिन्यात आयएनएस सिंधुघोष गोदीत प्रवेश करत असताना गाळात रुतली होती.
सिन्हांचाही राजीनामा?
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘सिंधुरत्न’ दुर्घटनाग्रस्त
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटांनंतर जलसमाधी मिळालेल्या ‘आयएनएस सिंधुरक्षक’पाठोपाठ नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा सातत्याने अपघातग्रस्त होण्याची मालिका

First published on: 27-02-2014 at 06:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy personnel injured in a mishap involving a kilo class submarine off mumbai coast