मुंबईत चक्क केकमधून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) मोठी कारवाई केली असून केक आणि ब्राऊनीमध्ये ड्रग्ज भरुन विक्री करणाऱ्या मोड्यूलचा पर्दाफाश केला आहे. ड्रग्सने भरलेले हे केक आणि ब्राऊनी रेव्ह पार्टीमध्ये पुरवले जात होते. याप्रकरणी एनसीबीकडून २५ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केकमधून ड्रग्ज पुरवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माझगावमधील बेकरीवर धाड टाकली. यावेळी तपास केला असता ड्रग्ज वापरुन तयार केलेला १० किलोचा (हॅश ब्राऊनी) केक सापडला. हा केक डिलिव्हरीसाठी तयार ठेवण्यात आला होता.

धक्कादायक बाब म्हणजे, एका मानसोपचार तज्ञाकडून बेकरीच्या नावाखाली ही ड्रग्ज लॅब चालवली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतीला एका प्रतिष्ठित रुग्णालयात तो कार्यरत आहे. रहमीन असं या आरोपी डॉक्टरचं नाव असून कॉलेजमध्ये असल्यापासून तो या ड्रग्सच्या व्यावसायात होता.

“आरोपी वेगवेगळ्या प्रकारचे केक पुरवत होता. यासाठी त्याने केकला वेगवेगळी नावं दिली होती ज्यामध्ये रेम्बो केक, हॅश ब्राऊनीज आणि पोर्ट ब्राऊनीज यांचा समावेश होता. रेन्बो केकमध्ये चरस ,गांजा आणि हशीस असायचं. तर पोर्ट ब्राऊनीमध्ये गांजा असायचा. याशिवाय आम्ही ३५० ग्रॅम ओपियम आणि १ लाख ७० हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

तपासादरम्यान आरोपी डॉक्टर रहमनीनने ओटीटीवर ड्रग्जसंबंधी एक वेब सीरिज पाहिल्यानंतर ही कल्पना आपल्याला सुचल्याचं सांगितलं. रहमनीन सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑर्डर घ्यायचा आणि स्वत: डिलिव्हरी करण्यासाठी जात असे. दक्षिण आणि पश्चिम मुंबईत त्याचे अनेक ग्राहक होते.

तपासादरम्यान रहमीनने ड्रग्ज पुरवठा करण्याची माहिती दिली. यानंतर दक्षिण मुंबईतून ४० वर्षीय रमजान शेख याला ५० ग्राम हॅशिशसोबत क्रॉफर्ड मार्केट येथून अटक करण्यात आली. एनसीबीने केक आणि ब्राऊनीमधून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचा पर्दाफाश करण्याची ही दुसरी घटना आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb arrests psychologist for baking selling brownies infused with drugs in south mumbai sgy
First published on: 14-07-2021 at 14:27 IST