महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाली असली तरी बिहारमध्ये एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता त्या राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पाटण्यात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा १६वा वर्धापनदिन पाटणा शहरात साजरा केला जाणार आहे. ९ आणि १० जून असे दोन दिवस पक्षातर्फे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १० तारखेला पाटणा शहरात पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. जनता परिवार आणि भाजप अशी चुरशीची लढाई असताना राष्ट्रवादी बिहार निवडणुकीत आपले नशीब अजमविणार आहे.