पुरेसे संख्याबळ नसल्याने आपण सत्ता स्थापन करु शकत नसल्याचे भाजपाने जाहीर केल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पर्यायासाठी तिन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या सत्तासमीकरणासाठी राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे चित्र आहे. मात्र, काँग्रेसचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांच्या निर्णयानंतर एकत्रितपणे आम्ही आघाडीचा निर्णय जाहीर करु, असे राष्ट्रावादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मलिक म्हणाले, पर्यायी सरकारन निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आघाडीत निवडणूक लढवल्याने यापूर्वी शरद पवारांनी जाहीर केलं होतं की काँग्रेसला विचारुन आम्ही निर्णय घेऊ. मात्र, काँग्रेसचा अजून निर्णय झालेला नाही. संध्याकाळी त्यांच्या महत्वाच्या नेत्यांसोबत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होईल. संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांचा निर्णय येईल. त्यानंतर साडेचार वाजता राष्ट्रवादी आपला निर्णय घोषित करेल.

कमीत कमी तीन पक्ष एकत्र आल्याशिवासय सरकार स्थापन होऊ शकत नाही. काँग्रेस आमदार शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यात तयार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकारी बैठकीत निर्णय झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल, असेही यावेळी मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शरद पवार हे सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार नाहीत, ते सध्या मुंबईतच आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नेते काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. काँग्रेसचा निर्णय झाल्यानतंर आम्ही चार वाजता मुंबईत भेटणार आहोत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना एनडीएसोबत नातं तोडत असल्याचं दिसतंय, असेही मलिक यावेळी म्हणाले.