मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी केली आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन अहिर यांनी शनिवारी पक्षाची भूमिकाच जाहीर केली. काँग्रेसपासून अंतर ठेवूनच मुंबईत पक्ष संघटना बळकट करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी मुंबईच्या अध्यक्षपदी पुन्हा सचिन अहिर यांची निवड जाहीर केली. नवाब मलिक हे प्रदेश उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते असतील. प्रकाश शेंडगे व कृष्णकांत कुदळे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या  अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, तसेच मालाडमध्ये घडलेल्या दारूकांडाच्या प्रकारावर सरकारला धारेवर धरण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे, असे तटकरे यांनी सांगितले. मात्र सध्या भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत थेट भाष्य करण्याचे टाळत तटकरे यांनी सावध पवित्रा घेतला.
मुंबईतील उत्सवांचे समर्थन
मुंबईत रस्त्यावर उत्सव साजरे करण्यास न्यायालयाने र्निबध आणले आहेत, परंतु त्याबाबत सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मत अहिर यांनी व्यक्त केले. नागारिकांच्या भावनांचीही दखल घेऊन सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी मुंबईतील उत्सवांचे समर्थन केले.
दाऊदची सशर्त शरणागती अमान्यच – पवार
मुंबई: बॉम्बस्फोटांनंतर दाऊदने भारतास शरण येण्याची तयारी दाखविली होती, पण त्याने त्यासाठी काही अटीही घातल्या होत्या. त्या अटी राज्य सरकारला मान्य नसल्यामुळेच दाऊदचा शरणागतीचा प्रस्ताव आम्ही अमान्य केला, असे स्पष्टीकरण तत्कालीन मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार म्हणून भारतास हवा असलेला कुख्यात दाऊद इब्राहीम याने भारतासमोर शरणागतीची तयारी दाखविली होती, त्याने तसा प्रस्तावही दिला होता, पण शरद पवार यांनी तो फेटाळला, असा दावा राम जेठमलानी यांनी केला होता. त्यावर पवारांनी स्पष्टीकरण दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp set to go it alone in bmc polls
First published on: 05-07-2015 at 03:33 IST