मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबत मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड गोव्याला जाणार असून शिवसेनेच्या नेत्यांसह बैठक होऊन अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर काँग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. अंतिम चर्चेसाठी प्रफुल्ल पटेल व जितेंद्र आव्हाड यांची मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांसह बैठक होईल. शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल तो निर्णय गोव्यात प्रल्ल्ल पटेल जाहीर करतील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांच्यावर बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी पवारांनी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवार फडणवीस यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यावर मलिक यांनी उत्तर दिले. पवार मुख्यमंत्री असताना फडणवीस विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नव्हते. कालपर्यंत भाजपच्या विधानसभेत ३०-४० जागा निवडून येत होत्या. ते आता पवार यांच्यावर भाष्य करत आहेत, असा चिमटाही मलिक यांनी काढला.