scorecardresearch

ED Arrests Nawab Malik : राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ; अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक तुरुंगात

मलिक यांचे नाव कुख्यात दाऊदच्या व्यवहाराशी जोडले गेल्याने राष्ट्रवादीला ते अधिक अडचणीचे ठरणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: छगन भुजबळ, अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ नवाब मलिक या पहिल्या फळीतील नेतेमंडळींच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

विविध नेत्यांवर होणारे आरोप किंवा नेतेमंडळींच्या विरोधात झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्याचे परिणामही राष्ट्रवादीला भोगावे लागले आहेत. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. खंडणीच्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुंरुगात आहेत. या यादीत नवाब मलिक यांची भर पडली. मलिक यांचे नाव कुख्यात दाऊदच्या व्यवहाराशी जोडले गेल्याने राष्ट्रवादीला ते अधिक अडचणीचे ठरणार आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांशी मलिक यांचे नाव जोडण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी मलिक आणि दाऊदचे संबंध याचा भाजप पुरेपूर उपयोग करण्याची चिन्हे आहेत. सिंचन घोटाळय़ाच्या आरोपांची किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. सिंचन घोटाळय़ात आरोप झाल्यावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. नवाब मलिक यांना तूर्त राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अभय दिले असले तरी दाऊद किंवा दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवठा हे होणारे आरोप राष्ट्रवादीला त्रासदायक ठरू शकतात. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीच्या आजी-माजी मंत्र्यांना भाजपने लक्ष्य केले होते. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे पडलेले छापे किंवा त्यांच्या मामांनी खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर ईडीची जप्ती यावरून केंद्रीय यंत्रणा अजित पवार यांच्या हात धुऊन मागे लागल्याचे स्पष्ट होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही भाजपने टीका केली. त्यापाठोपाठ केंद्रीय यंत्रणांचे त्यांच्या संस्थांवर छापे पडले होते.

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचीही ईडीने चौकशी केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात आरोप किंवा केंद्रीय यंत्रणांचे छापे वा चौकशी सुरू झालेली नाही.

राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईतून दिसून आले. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. 

– गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेली अटक ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. नवाब मलिक यांच्या कारवाईने विरोधक घाबरणार नाहीत तर भाजप सरकारविरोधात आणखी आक्रमक पद्धतीने आवाज उठवू. 

–  प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीन खान

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp suffered another blow after anil deshmukh nawab malik arrest by ed zws