२०१७ पासून पुढे तीन खेपा ग्राहय़ धरणार!

तीन किंवा त्याहून अधिक वेळा केंद्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशोच्छुकांना ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एसीआय) दिलासा दिला आहे. वैद्यकीयसाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या नीट या परीक्षेकरिता तीन वेळा केंद्रीय प्रवेश परीक्षा (आधीची एआयपीएमटी, नंतरची नीट) दिलेल्या परीक्षार्थीना अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र हा नियम २०१७ पासून लागू करण्यात यावा, असा निर्णय एमसीआयने घेतल्याने या परीक्षार्थीना दिलासा मिळाला आहे. म्हणजेच २०१७ पासून पुढे विद्यार्थ्यांच्या नीटच्या तीन खेपा ग्राहय़ धरल्या जाणार आहेत. परिणामी एक किंवा त्याहून अधिक वेळा केंद्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे नीट देण्याची मुभा मिळाली आहे.

नीट येण्याआधी एआयपीएमटी या केंद्रीय परीक्षेद्वारे केंद्राच्या अख्यत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये, राज्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अखिल भारतीय स्तरावरील (ऑल इंडिया) कोटा आदी ठरावीक जागांवरील प्रवेश होत. मात्र आता या परीक्षेची जागा नीटने घेतली आहे.

तसेच, देशभरातील सर्वच सरकारी, खासगी, अभिमत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांकरिता आता नीट हीच परीक्षा ग्राहय़ धरली जाणार आहे. त्यातच गेल्या महिन्यात एका परिपत्रकाद्वारे नीट किंवा आधीची एआयपीएमटी ही केंद्रीय परीक्षा तीन वेळा दिलेल्या विद्यार्थ्यांना नीटसाठी अपात्र ठरविण्यात आले. तसेच नीटकरिता जास्तीत जास्त २५ वर्षे (मागासवर्गीयांकरिता वय वर्षे ३०) ही वयाची अट ठेवण्यात आली आहे. परंतु, परीक्षांच्या खेपांबातचा नियम २०१७ पासून लागू करण्यात आल्याने ते नैसर्गिक न्यायाच्या विरोधात होते.

अर्ज करण्याची संधी

या आधी एआयपीएमटी दिलेल्या काही विद्यार्थ्यांच्या नीटच्या संधी त्यामुळे कमी झाल्या होत्या. तर काहींनी तीन किंवा त्याहून अधिक वेळा ही परीक्षा दिल्याने ते २०१७च्या परीक्षेकरिता अपात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची दखल घेत आता २०१७पासून पुढे नीटच्या तीन खेपा (संधी) ग्राहय़ धरण्यात याव्या, असा खुलासा एमसीआयने सीबीएसईकडे केला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांकरिता अर्ज करण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची माहिती परीक्षा घेणाऱ्या सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.