मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘नीट पीजी २०२५’ परीक्षेची तारीख वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) जाहीर केली आहे. त्यानुसार ‘नीट पीजी २०२५’ परीक्षा १५ जून रोजी होणार आहे. संगणक आधारित होणारी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेशी संबंधित तपशील आणि इतर माहिती योग्य वेळी परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ होण्यासाठी डॉक्टरांचा कल पदव्युत्तर शिक्षणाकडे असतो. एमडी, एमएस आणि पदव्युत्तर पदविका यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नीट पीजी परीक्षा महत्त्वाची असते. वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून (नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस) या परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी देशभरातून जवळपास सव्वादोन लाखांच्या आसपास विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

यावर्षी ‘नीट पीजी २०२५’ परीक्षा १५ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येणार असून, संगणक आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षेशी संबंधित तपशील आणि इतर माहिती योग्य वेळी परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

कसे असेल परीक्षेचे स्वरुप

‘नीट पीजी २०२५’ ही परीक्षा संगणक आधारित स्वरुपात घेतली जाणार असून, ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने घेतली जाते. एमबीबीएस अभ्यासक्रमावर आधारित शरीरशास्त्र, शरीरविज्ञान, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषध, शस्त्रक्रिया, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, कान – नाक – घसा शास्त्र, नेत्ररोगशास्त्र, अस्थिव्यंगशास्त्र, मानसोपचार, रेडिओलॉजी, भूलशास्त्र, त्वचारोग आदी विषयांचा यामध्ये समावेश आहे. विविध वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांचे ज्ञान, समज आणि कौशल्यांचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रश्नांची निवड करण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पात्रता निकष काय आहेत

‘नीट पीजी २०२५’ परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ठरवलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्य आहे. त्यानुसार उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवी मिळवलेली असावी. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवाराने एक वर्षांची आंतरवासिता पूर्ण करणे आवश्यक आहे. आंतरवासिता पूर्ण झाली नसल्यास उमेदवार अर्ज करू शकत नाही. अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणतीही विसंगती आढळल्यास अर्ज अपात्र होऊ शकतो.