काळ्या, जांभळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर दररोज रात्री अवतरणाऱ्या ताऱ्यांच्या विश्वाचे रहस्य आता वरळीच्या नेहरू तारांगणात उलगडून सांगण्यात येणार आहे. कारण, १ सप्टेंबरपासून तारांगणाने ‘सिक्रेट लाइव्हज् ऑफ स्टार्स’ हा खेळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ताऱ्यांच्या गोष्टी या चित्तवेधक आणि मनोरंजक तर असतातच. शिवाय त्यांचा आपल्या जीवनावरही मोठा परिणाम होत असतो. आपल्याला दिसणारा सूर्य प्रखर, तेजोमय असला तरी तो एकमेव तसा तारा नाही, याची माहिती या कार्यक्रमातून दिली जाईल. अवकाशात सूर्यासारखे असंख्य तारे आहेत. केवळ सूर्य आपल्या अधिक जवळ असल्याने तो आपल्याला एकमेवाद्वितीय वाटतो. आपल्यापासून साडेपाच प्रकाशवर्षे दूर असलेल्या प्रॉक्सिमा सेंटॉरी या ग्रहावरून सूर्याचे निरीक्षण केले तर सूर्य हा कॅसिओपिआ नक्षत्रसमूहातील सर्वात अंधुक तारा वाटेल. ताऱ्यांशी संबंधित अशी रंजक माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडणार आहे.
प्रत्येक ताऱ्याचे आयुष्य अतिशय वैशिष्टय़पूर्ण असते. काही तारे वर्षांनुवर्षे चमकत राहतात. तर काही तारे विस्फोटात लुप्त होतात किंवा त्यापासून नवे तारे तयार होतात. काही ताऱ्यांमधून वायू आणि धुळीचे ढगही तयार होता. ताऱ्यांशी संबंधित अशी सुरस माहिती प्रेक्षकांना दिली जाणार आहे.
वरळीतील नेहरु तारांगणात दिवसभरात या कार्यक्रमाचे चार खेळ होतील. हिंदी (दुपारी १२ आणि सायंकाळी ४.३०), मराठी (दुपारी १.३०), इंग्रजी (दुपारी ३) याप्रमाणे हे खेळ होणार आहेत.
थ्रीडी चित्रपटाचा अनुभव!
‘तारांगणाच्या अर्धवर्तुळाकार डोमवर डिजिटल ग्राफिक्सच्या मदतीने सांगितलेली ही ताऱ्यांची सुरस कथा प्रेक्षकांना थ्रीडी सिनेमा पाहिल्याचा अनुभव देईल,’ असा विश्वास नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी व्यक्त केला.