राज्य परिवहन महामंडळाला राज्य सरकारचे १५०० कोटींचे देणे असून, त्यापैकी ५०० कोटी रुपये महामंडळाला लवकरच दिले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली. हे पैसे मिळाल्यानंतर एसटी २५ नव्याकोऱ्या व्होल्वो गाडय़ा विकत घेणार असून या गाडय़ा प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरात लवकर रस्त्यावर येतील, अशी घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. मोरे यांनी एसटीच्या ६६व्या वर्धापनदिनी केली. एसटीसमोरील आव्हानांबाबतही त्यांनी भाष्य केले.
एसटीची शिवनेरी सेवा ही एक प्रतिष्ठित सेवा म्हणून गणली जाते. या सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. त्याबाबत ‘लोकसत्ता’ने वारंवार वृत्तही प्रसिद्ध केली आहेत. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाने आपल्या या प्रतिष्ठेच्या सेवेला महत्त्व देण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारकडून येणे असलेल्या १५०० कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये लवकरच एसटीला देण्यात येतील, असे आश्वासन खुद्द अजित पवार यांनी दिले आहे. हे ५०० कोटी रुपये एसटीला मिळाल्यावर सर्वप्रथम २५ नव्या व्होल्वो गाडय़ा विकत घेतल्या जाणार असल्याचे एसटीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
तसेच हा ५०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर सध्या फक्त व्होल्वो बसगाडय़ांमध्ये आणि काही निमआराम गाडय़ांमध्ये बसवलेली जीपीएस प्रणाली सर्व गाडय़ांमध्ये बसवण्यात येणार असल्याचेही गोरे म्हणाले. गाडय़ांची माहिती ठेवण्यास आणि ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यास या प्रणालीचा निश्चित फायदा होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. एसटीची भरती परीक्षा पूर्ण झाली असून या परीक्षेतील वाहक-चालक या पदांसाठीचा निकाल येत्या १५ दिवसांत जाहीर करणार असल्याचेही अध्यक्ष गोरे यांनी सांगितले.
डिझेल दरवाढीमुळे भाववाढ नाही
१ जूनपासून डिझेलच्या दरात लिटरमागे ५० पैशांची दरवाढ झाली आहे. यामुळे एसटीवर वार्षिक २२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र एसटीने नुकतीच २.५ टक्के भाडेवाढीला मान्यता मिळवली असून १ जूनपासून ही भाडेवाढ लागू झाली आहे.