सौरऊर्जेवर विविध स्तरांवर संशोधन सुरू असताना आतापर्यंतच्या सर्व सौरकुकरच्या कल्पनांना छेद देत ‘आयआयटी’मधील अविनाश प्रभुणे या विद्यार्थ्यांने नवीन संकल्पना आणली असून या संशोधनासाठी तो आता स्वामित्व हक्कासाठीही प्रयत्न करणार आहे.
‘आयआयटी’ मुंबईच्या ‘आयडीसी’ संस्थेत प्रॉडक्ट डिझाइनचे प्रशिक्षण घेणारा अविनाश याने एक सौरकुकर तयार केला असून तो ओव्हनसारखे काम करतो. गोलाकार असल्यामुळे सूर्यप्रकाशानुसार त्याची जागा बदलावी लागत नाही. तो वातानुकूलित यंत्राप्रमाणे स्वयंपाकघराच्या खिडकीवर कायमस्वरूपी लावून ठेवता येऊ शकतो. तापमान नियंत्रकाच्या सोयीमुळे पदार्थानुसार त्यात आवश्यक ते तापमान राखता येते. विशेष म्हणजे या सौरकुकरसाठी विशिष्ट भांडय़ांची गरज नसून कोणत्याही धातूची भांडी त्यात ठेवता येतात. या कुकरला अविनाशने एक वेगळ्या प्रकारचे कोटिंग तयार केले आहे, ज्यामुळे अवघ्या २० मिनिटांमध्ये अन्न शिजण्याची प्रक्रिया सुरू होते तसेच कुकरमध्ये २०० डिग्रीपर्यंतचे तापमानही मिळू शकते. या कोटिंगच्या स्वामित्व हक्कासाठी अविनाश अर्ज करणार आहे.  गच्चीरहित इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना डोळ्यांसमोर ठेवून हा कुकर तयार केला असल्याचे तो सांगतो.