बावीस, बेचाळीस या संख्यानामांऐवजी आता वीस दोन, चाळीस दोन अशा बालभारतीच्या पुस्तकात सुचवण्यात आलेल्या नव्या पर्यायामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर पडदा टाकत ‘कोणतीही संख्यानामे हद्दपार झालेली नाहीत. बावीस, बेचाळीस अशी जुनी संख्यानामे बदलण्यात आलेली नाहीत. विद्यार्थ्यांना सांख्यिकी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अजून एक पर्याय सुचवण्यात आला आहे,’ असे स्पष्टीकरणे बालभारतीच्या गणित समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी केले आहे.

दुसरीची पाठय़पुस्तके यंदापासून बदलली आहेत. त्यातील गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनासाठी संख्येची फोड करून देण्यात आली आहे. म्हणजेच २२ या संख्येसाठी ‘वीस दोन’ असा पर्याय सुचवण्यात आला आहे. पुस्तकात ‘वीस दोन’ – ‘बावीस’ असे नमूद करण्यात आले आहे. २१ ते ९९ मधील शून्य एकक संख्या म्हणजे १०, २०, ३०.. या वगळून इतर संख्यांसाठी नवा पर्याय सुचवण्यात आला आहे. संख्यानामातील बदलामुळे संभ्रम निर्माण झाला.

त्यानुसार एकवीस, बत्तीस, सेहेचाळीस, पंचावन्न ही आतापर्यंत प्रचलित संख्यानामे भाषेतून हद्दपार होणार का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. समाज माध्यमांवरही आता १९४७ हे वर्ष एक हजार नऊशे चाळीस सात असे वाचायचे का अशा प्रकारच्या चर्चा आणि विनोदही रंगले.

मात्र, कोणतीही संख्यानामे किंवा जुन्या पद्धतीचे संख्यावाचन हे हद्दपार करण्यात आलेले नाही. आता प्रचलित असणारी संख्यावाचनाची पद्धत कायमच राहणार आहे, असे स्पष्टीकरण बालभारतीच्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी दिले आहे.

शिक्षक, तज्ज्ञांमध्ये चर्चा

संख्यानामातील बदलांवरून शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांच्यामध्ये मंगळवारी चर्चा रंगल्या होत्या. वीस दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यांना कळणे सोपे जाणार आहे. मूळ संख्यानामात कायम स्वरूपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या कळण्यासाठी, संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत योग्य आहे, अशी मते शिक्षकांनी व्यक्त केली. त्याचवेळी वीस दोन म्हटल्यावर विद्यार्थी बावीस ऐवजी दोनशे दोन लिहिण्याचा धोका आहे असाही एक मतप्रवाह आहे. केवळ भाषा किंवा जोडाक्षरे कठीण वाटतात म्हणून संख्यानामे बदलणे चुकीचे असल्याचा आक्षेपही अनेकांनी घेतला.

गोंधळ यंदाच का?

गेल्यावर्षी पहिलीसाठी नवी पाठय़पुस्तके आली. त्यामध्ये दशक ही संकल्पना वापरण्यात आली होती. त्यानुसार बावीस या संख्येसाठी वीस दशक दोन असा पर्याय देण्यात आला. त्यावेळी काहीच गोंधळ कसा निर्माण झाला नाही? ही संकल्पना स्विकारली गेली, त्यावेळी भाषेवर आक्रमण किंवा तत्सम काहीच वाटले नाही, तर ते यंदाच का असा प्रश्न अभ्यास मंडळातील सदस्यांनी उपस्थित केला आहे.

संख्या वाचनासाठी हा केवळ पर्याय.

‘संख्यानामे बदलण्यात आलेली नाहीत. जुन्या पद्धतीने बावीस, बत्तीस, सत्त्याऐंशी ही नामे कायमच राहणार आहेत. विद्यार्थ्यांना सत्त्याऐंशी म्हटल्यावर ऐंशी आणि सात हे कळले पाहिजे. त्यासाठी आठ दशक दोन, ऐंशी दोन असे पर्याय देण्यात आले आहेत. याचा अर्थ जुनी संख्यानामे रद्द केली अथवा बदलली असे होत नाही. ज्या मुलांना जी संख्यानामे कळू शकतील ती शिकवावीत जेणेकरून गणिती संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. पुढील इयत्तांमध्ये मुलांची भाषिक जाण वाढेल तेव्हा ती प्रचलित संख्या नामे वापरू शकतील. मात्र, संख्यानाम कळले नाही म्हणून गणित कळत नाही असे होऊ नये यासाठी हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १९४७ ही संख्या एकोणीसशे सत्तेचाळीस अशीही वाचता येते आणि एक हजार नऊशे सत्तेचाळीस अशीही वाचता येते. या संख्येच्या वाचनासाठी हे पर्याय आहेत तसाच पर्याय दोन अंकी संख्येसाठी सुचवण्यात आला आहे.’

– डॉ. मंगला नारळीकर