मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली, अंधेरी पूर्व मेट्रो ७’ मार्गिका शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने धावणार असून या दोन्ही मार्गिका ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ला जोडण्यात येणार आहेत. या तिन्ही मार्गिका परस्परांशी जोडल्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नागरिकांना प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. परिणामी, पूर्व – पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत रेल्वेच्या गर्दीतून घडणारा प्राविडी प्राणायामही टळणार आहे. एका मेट्रोतून उतरल्यानंतर दुसऱ्या मेट्रोने इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे उपनगरवासीयांना दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकलमधील गर्दी, धक्काबुक्की, तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागत असल्यामुळे मुंबईकर मेताकुटीस आले आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये रस्ते मार्गे अंधेरी ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आता ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ शुक्रवारपासून वाहतूक सेवेत दाखल होत असल्याने अंधेरी – दहिसर दरम्यानचा गारेगार प्रवास गतीमान होणार असून रस्ते मार्गे जाताना होणारी वाहतूक कोंडी, रेल्वेतील गर्दी टाळून मुंबईकरांना अंधेरी – दहिसर प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या दोन्ही मार्गिका ‘घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १’शी जोडण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत शुक्रवारपासून मेट्रो मार्गिकांचे जाळे आकाराला येत असून एका मेट्रोतून उतरल्यानंतर दुसऱ्या मेट्रोतून इच्छित स्थळी जाता येणार आहे. आता मुंबईत एकूण अंदाजे ४५.५१ किमी लांबीची मेट्रो मार्गिका सेवेत असणार आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवडमधील शाळांमध्ये उर्दू शिक्षकच नाहीत, जनहित याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल

‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरून दहिसर – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर प्रवास ४० मिनिटांमध्ये करता येणार आहे. तर ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरून दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व प्रवास ३५ मिनिटांमध्ये करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावरून थेट ‘मेट्रो १’च्या डी. एन. नगर मेट्रो स्थानकावरून वर्सोव्याच्या दिशेने वा घाटकोपरच्या दिशेने जात येणार आहे. तर वर्सोवा वा घाटकोपरवरून ‘मेट्रो १ ने’ डी. एन. नगर स्थानकावर पोहोचल्यानंतर ‘मेट्रो २ अ’च्या अंधेरी पश्चिम स्थानकावर पोहचून पुढे दहिसरला जाता येणार आहे. ‘मेट्रो १’ने घाटकोपर वा वर्सोव्यावरून येणाऱ्या प्रवाशांना पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानकावर उतरून पुढे ‘मेट्रो ७’वरील गुंदवली स्थानकावर पोहोचून पुढे दहिसरच्या दिशेने प्रवास करता येणार आहे. तर गुंदवलीला उतरून ‘मेट्रो १’मधील पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकावरून घाटकोपर वा वर्सोव्याला जात येणार आहे. एकूणच शुक्रवारपासून मुंबईकरांची नवी जीवनवाहिनी कार्यान्वित होणार आहे.

‘मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ जोडणी

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो १’ अंधेरी पश्चिम आणि डी. एन. नगर मेट्रो स्थानकाने जोडण्यात आला आहे.

‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो १’ मार्गिका गुंदवली आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकाने जोडण्यात आला आहे.

‘मेट्रो २ अ’

दहिसर – डी. एन. नगर

एकूण लांबी १८.५८९ किमी

१७ मेट्रो स्थानके

‘मेट्रो १’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका जोडणार

६४१० कोटी रुपये खर्च

२ एप्रिल २०२२ मध्ये लोकार्पण झालेला पहिला टप्पा

‘मेट्रो २ अ’ (पहिला टप्पा)

दहिसर – आरे

एकूण लांबी १०.९० किमी

एकूण स्थानके १०

आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा, दहिसर (पूर्व)

गुरुवारी लोकार्पण झालेला दुसरा टप्पा

‘मेट्रो २ अ’

वळनई – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर (दुसरा टप्पा)

९ किलो मीटर

८ मेट्रो स्थानके

वळनई, मालाड (प), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम (डी. एन. नगर)

 ‘मेट्रो ७’

दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व

एकूण लांबी १६.४७५ किमी

१३ मेट्रो स्थानके

‘मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ६’ मार्गिकांशी जोडणार

६२०८ कोटी रुपये खर्च

२ एप्रिल २०२२ मध्ये लोकार्पण झालेला टप्पा

‘मेट्रो ७’

दहिसर – आरे

एकूण लांबी ९.८२ किमी

एकूण स्थानक ९

दहिसर, आनंद नगर, कंदारपाडा, मंडापेश्वर, एक्सर, बोरिवली (पश्चिम), पहाडी एक्सर, कांदिवली (पश्चिम), डहाणूकरवाडी

‘मेट्रो ७’चा आज लोकार्पण झालेला दुसरा टप्पा

‘मेट्रो ७’

गोरेगाव पूर्व – गुंदवली

अंदाजे ७ किमी

एकूण मेट्रो स्थानके चार : गोरेगाव पूर्व, जोगेश्वरी पूर्व, मोगरा, गुंदवली

मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी बंगळुरू येथील एका कंपनीने ५७६ डबे असलेल्या ८४ गाड्यांची बांधणी केली असून ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांच्याच्या पहिल्या टप्प्यावर यापैकी ११ गाड्या धावत आहेत. शुक्रवारपासून संपूर्ण मार्गावर २२ मेट्रो गाड्या धावणार आहेत. एका गाडीची प्रवासी क्षमता दोन हजार ३०८ व्यक्ती इतकी आहे. देशी बनावटीच्या मेट्रो गाड्या स्वयंचलित आहेत. त्यांचा ताशी वेग ८० कि.मी. इतका आहे. मात्र त्या ताशी ७० किमी वेगाने धावणार आहेत. या गाड्यांतील सर्व डबे वातानुकूलित असून दरवाजे स्वयंचलित आहेत. अग्निरोधक यंत्रणा असलेल्या गाड्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सायकल ठेवण्यासाठी प्रत्येक डब्यात दोन स्टॅन्ड असणार आहेत. वृद्ध आणि अपंगांना व्हीलजेअरसह प्रवास करण्याची व्यवस्था मेट्रोमध्ये आहे. प्रत्येक डब्यातील ऑप्टिकल फायबर नेटवर्कमुळे इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

मेट्रो स्थानकावरील फलाटावर काचेची सुरक्षा भिंत

लोकलमधून उतरताना रुळावर पडण्याच्या, फलाटावरून उड्या मारण्याच्या घटना, अपघात घडतात. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’मध्ये मात्र अशा घटना, अपघात होणार नाहीत. या प्रकल्पात मेट्रो स्थानकातील फलाटावर ‘प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर सिस्टीम’ (पीएसडी) कार्यान्वित आहे. मेट्रो स्थानकावर फलाटावर काचेची सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. ही भिंत मेट्रो गाडीच्या प्रवेशद्वाराइतकीच उघडली जाईल आणि गाडी गेल्यानंतर बंद होईल. यामुळे प्रवासी रूळावर पडण्याची शक्यताच यात नाही. तसेच कुणालाही रुळाच्या आसपासही जाता येणार नाही.

महिलांसाठी राखीव डबा

लोकलप्रमाणे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रे ७’मध्येही महिलांसाठी विशेष सोय आहे. सहा डब्यांच्या मेट्रो गाडीतील एक डबा महिलांसाठी राखीव आहे. या डब्यावर ‘केवळ महिलांसाठी’ असे चिन्ह आहे.

वेळापत्रक

सकाळी ६ वाजता पहिली गाडी सुटेल तर शेवटची गाडी रात्री १० वाजता सुटेल

प्रत्येक मेट्रो स्थानकावर कमीत कमी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी ‘१०३’ हेल्पलाईन क्रमांक, पहिल्या टप्प्याच्या संपूर्ण मार्गातील स्थानकात एकूण १०३ सरकते जिने, ६८ उद्वाहकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

तिकीट दर

१० ते ५० रुपये

० ते ३ किमी – १० रूपये

३ ते १५ किमी – २० रूपये

१२ ते १८ किमी – ३० रूपये

१८ ते २४ किमी – ४० रूपये

२४ ते ३० किमी – ५० रूपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New metro in mumbai citizens for travel new option available mumbai print news ysh
First published on: 20-01-2023 at 10:20 IST