पाडव्याच्या निमित्ताने कलाकृ ती पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार

मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने चित्रपट आणि नाटकांचा शुभारंभ करण्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रघात गेल्यावर्षीपासून मोडीत निघाला असून यंदा पूरक परिस्थिती निर्माण होईल असे वाटत असतानाच करोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागला. त्यामुळे काही मोजक्या कलाकृती वगळता कुठेही नवे चित्रपट, नाटके यांचे मुहूर्त करण्यात आले नाहीत. आर्थिक अडचणी, परिस्थिती बाबत असलेली अनिश्चितता यामुळे बहुतेक निर्मात्यांनी जोखीम पत्करणे टाळले. मात्र, काही निर्मात्यांनी समाजमाध्यमांचा आधार घेत चित्रपटांची घोषणा के ली.

पाडव्याच्या दिवशी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या जातात किंवा नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाते. नाटय़क्षेत्रातही पहिली जाहिरात देणे, तालिमींना सुरुवात करणे, पहिला प्रयोग करणे असे प्रघात आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याला किमान दहा ते बारा नव्या चित्रपटांचे मुहूर्त होतात. यावर्षी मात्र एखाद दुसरी कलाकृती वगळता फारसे नवे मुहूर्त करण्यात आले नाहीत, अशी माहिती चित्रपट वितरक समीर दीक्षित यांनी दिली.

अरविंद जगताप लिखित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘चार्ली’ या एकाच नाटकाची घोषणा पाडव्याच्या मुहूर्तावर झाली. केवळ जाहिरात आणि समाजमाध्यमांवर पोस्टर प्रकाशित करून अत्यंत साधेपणाने हा मुहूर्त झाला. जानेवारी दरम्यान करोना आटोक्यात येतोय असा अंदाज बांधून अनेक निर्माते नव्या नाटकांच्या तयारीला लागले होते. पण मर्यादित आर्थिक आवाका असलेल्या नाटय़ क्षेत्राला आधीच भरपूर चटके बसले आहेत. त्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना नवे नाटक घोषित करणे ही मोठी जोखीम असल्याचे नाटय़ निर्मात्यांचे म्हणणे आहे.

‘डिसेंबरअखेरीस सुरू झालेले नाटय़क्षेत्र अवघ्या दोन महिन्यातच बंद पडले. ज्या निर्मात्यांनी नाटक पुन्हा सुरू करण्याचे धाडस केले, आज ते लाखोंचा तोटा सहन करत आहेत. पुढची परिस्थिती तर अधिक अनिश्चित आहे. कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. अशा वेळी केवळ मुहूर्त करून नाटकाबाबत कशाचीही शाश्वती देता येत नसेल, तर कशाच्या आधारावर मुहूर्त करायचे,’ असा सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी केला आहे. ‘ पुन्हा र्निबध लागू झाल्यामुळे थांबून राहण्यापेक्षा पाडव्याचा मुहूर्त साधून नाव जाहीर केले. त्या निमित्ताने लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण होईल. परिस्थिती निवळली की  ‘चार्ली’ रंगभूमीवर येईल,’ असे नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले.

मुहूर्ताचे मानकरी

अभिनेते सुबोध भावे यांनी समाजमाध्यमांवरून ‘मानापमान’ या सांगीतिक चित्रपटाची घोषणा केली. २०२२ च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘कटय़ार काळजात घुसली’ यानंतरचा हा त्यांचा दुसरा सांगीतिक चित्रपट आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा टीझर तर चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शित ‘बिबटय़ा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.  दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या ‘टकाटक २’ या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. पाडव्याच्या निमित्ताने गोव्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. अभिनेता सौरभ गोखले, स्न्ोहा चव्हाण, निशिगंधा वाड यांची मुख्य भूमिका असलेल्या, सतीश महादू फुगे यांचे  दिग्दर्शन असलेल्या ‘बॅक टु स्कूल’ या आणखी एका मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा चार-पाच दिवसांपूर्वी पार पडला. ‘ख्वाडा’, ‘बबन’सारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेले अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या ‘रौंदळ’ या चित्रपटाचे पोस्टर पाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आले. गजानन पडोळ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘गाव आलं गोत्यात, १५ लाख खात्यात’ असे भलेमोठे शीर्षक असलेल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.