ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील अनधिकृत इमारतींमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांविषयी एकीकडे राजकीय वर्तुळातून कळवळा व्यक्त केला जात असतानाच, ठाणे महापालिकेसह या भागातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणांनी अनधिकृत इमारतींमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सोमवारपासून या परिसरात या मुद्दयावरून नवा संघर्ष उभा राहाण्याची शक्यता आहे. सुमारे १०४९ धोकादायक बेकायदा इमारतींसह सुमारे पाच हजार बांधकामांना या नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता आहे.
कळवा, मुंब्र्यासह कोपरी, वागळे, वर्तकनगर, घोडबंदर या भागांतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक इमारती अनधिकृत असून, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचे बालेकिल्ले या बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जोरावर पोसले गेले आहेत. मुंब्रा-शीळ येथील इमारत दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या ठाण्यातील आमदारांनी मुंब्रा भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला. मात्र, शुक्रवारी महापालिकेने मुंब्र्यासह ठाणे शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आणि शिवसेना नेत्यांचे धाबे दणाणले. ठाणे महापालिका हद्दीत सुमारे १०४९ धोकादायक बेकायदा इमारतींचा समावेश असून, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या किसननगर भागात अशा इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. कळवा, विटावा, दिवा, बाळकूम, खारेगाव, कोळीवाडा अशा मुळ गावांमधील बेकायदा बांधकामांची संख्या वारेमाप असून वर्तकनगर भागातील लोकमान्यनगर परिसरात तर जवळपास ९८ टक्के बांधकामे बेकायदा आहेत. या बांधकामांना नोटिसा बजाविल्यास स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
आणखी एकाला अटक
शीळ दुर्घटने प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी महापालिकेच्या मालमत्ता विभागातील लिपीक सुभाष मोतीराम वाघमारे याला अटक केली आहे. महापालिकेने वाघमरे यास निलंबीत केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2013 रोजी प्रकाशित
ठाण्यात आजपासून नवा संघर्ष?
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील अनधिकृत इमारतींमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांविषयी एकीकडे राजकीय वर्तुळातून कळवळा व्यक्त केला जात असतानाच, ठाणे महापालिकेसह या भागातील वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणांनी अनधिकृत इमारतींमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे.

First published on: 15-04-2013 at 04:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New strugle from today in thane