नववर्ष स्वागतासाठी चौपाटय़ांवर गर्दी
न्यायालयाने पहाटे पाच वाजेपर्यंत जल्लोषाला परवानगी दिल्याने नववर्षांच्या स्वागताची तयारी करणाऱ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आणि नववर्षांच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सर्व चौपाटय़ा, गेट वे ऑफ इंडिया गर्दीने फुलून गेले. अनेकांनी मागच्या वर्षभरात घडलेल्या भल्या-बुऱ्या आठवणींना विसरून विसावा घेण्यासाठी कुटुंबासह बाहेर पडत, घरचे जेवण आणत चौपाटीवर मुक्काम ठोकला..तर रेस्तराँमध्ये आयोजित पाटर्य़ामध्ये तरुणाईची पावले थिरकली. त्याचवेळी या साऱ्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी हजारो पोलिस, अग्निशमन दलाचे आणि ‘एनडीआरएफ’चे जवान डोळय़ांत तेल घालून सोहळय़ावर नजर ठेवून होते.
नववर्षांच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी अनेकांनी कार्यालयाला दांडी मारली, तर अनेकांनी अर्धा दिवस भरून घरची वाट धरली. बहुसंख्य मुंबईकर दुपारीच खासगी गाडय़ांनी वसई, विरार, डहाणू, अलिबाग, मुरुड आदी ठिकाणी रवाना झाले. हळूहळू सूर्य अस्ताला जाऊ लागला आणि थंडीचा कडाका वाढू लागला. बोचऱ्या थंडीची पर्वा न करता असंख्य मुंबईकर गिरगाव, दादर, जुहू, मार्वे आदी चौपाटय़ांवर जमू लागले. अनेक जण आपल्या कुटुंबासह किनाऱ्यावर नव्या वर्षांच्या स्वागतासाठी आले होते. एरवी धकाधकीच्या जीवनात मोकळा वेळ न मिळणारे समुद्रकिनाऱ्यावर चटया अंथरून मनमोकळेपणाने गप्पांमध्ये रंगले होते. अंताक्षरीचे स्वरही चौपाटय़ांवर कानी पडत होते. त्याचवेळी पिपाण्यांचा कर्कष्य आवाज करीत तरुणांची हुल्लडबाजी सुरू होती. रात्र सरू लागताच सोबत आणलेले जेवणाचे डबे उघडले जात होते. उंधीओ, पावभाजी, कोंबडी-मटण असा ताव मारत थर्टीफर्स्टचा आनंद लुटला गेला.रात्री उशीरा भरधाव वेगात दुचाकी चालविणारे तरुण रस्त्यांवर मोकाट सुटले होते. मात्र चौकाचौकांमध्ये पोलिसांच्या नाकाबंदीला त्यांना सामोरे जावे लागत होते. रेस्तराँमध्ये पार्टी उरकून बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले होते. मात्र आपण पकडले जाऊ नये यासाठी पोलिसांची नजर चुकवून गल्ल्यागल्ल्यांचा आधार घेत मद्यपींची ‘धूम’ सुरूच होती. पोलिसांची पाठ फिरताच काही तरुण चौपाटय़ा, मैदाने आणि पदपथाच्या आडोशाला मद्याचे प्याले रिचवित होते. काही ठिकणी हॅलोजनच्या प्रकाशझोतात क्रिकेट, हॉलिबॉल आदींचे डाव रंगले होते. अवघी मुंबापुरी नववर्षांच्या स्वागताच्या जल्लोषात रंगून गेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशमन दल-एनडीआरएफ सज्ज
नववर्षांच्या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी पालिकेने गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) प्रत्येकी १५ जवान तैनात केले होते. पालिकेतील मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांना वायरलेस सेट, लाईफगार्ड जॅकेट, बोट देण्यात आली होती. तसेच एखादी दुर्घटना घडलीच तर मदतीसाठी चौपाटय़ांवर अग्निशमन दलाच्या जवानांनाही सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र मद्याच्या अंमलातील अनेक तरुण समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना रोखताना अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागत होते.
नववर्षांच्या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस दलातील सुमारे २० हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सज्ज होते. जल्लोषाच्या नादात चेंगराचेंगरी होऊ नये, महिलांवर अतिप्रसंग ओढवू नयेत, मद्यपी वाहनांना वेसण घालण्यासाठी नाक्या-नाक्यांवर पोलीस तैनात होते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. गर्दीच्या ठिकाणी कोणताही घातपात होऊ नये यासाठी पोलीस सतर्क होते. ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरू होती. एसआरपीच्या दोन तुकडय़ा, होमगार्डच्या १०० अधिकाऱ्यांबरोबरच एक  हजार गार्डही पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उतरले होते. गर्दी लक्षात घेता अनेक ठिकाणी बॅरिकेड लावून वाहतुकीचे नियमन करण्यात येत होते. रात्री १२ च्या ठोक्याला मुंबईत एकच जल्लोष झाला आणि त्यानंतर १.३० सुमारास अनेकांनी शेवटची विशेष लोकल पकडण्यासाठी परतीची वाट धरली. तर अनेकांनी सकाळी पाचनंतरच्या गाडीचा बेत ठरवला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year celebration in mumbai
First published on: 01-01-2014 at 02:02 IST