मुंबई: लोकल प्रवासावरील र्निबध हटविण्यात आल्यानंतर प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली असून परिणामी लोकल डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहून पुन्हा धोकादायकरित्या प्रवास होऊ लागला आहे. यामुळे प्रवासादरम्यान प्रवासी लोकलमधून पडून अपघात होऊ लागले आहेत. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच ३१५ प्रवाशांचा लोकल तसेच मेल, एक्स्प्रेसमधून तोल गेल्याने मृत्यू तसेच गंभीर जखमी झाल्याचे उघडकीस आले आहे.
मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेला होणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. उपनगरातून मुंबई शहराकडे सकाळी किंवा सायंकाळी रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. परंतु सध्या गर्दीमुळे हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. गर्दीच्या वेळी लोकलच्या डब्यात प्रवेश करण्यास मिळत नाही. परिणामी नाईलाजाने डब्यांच्या दरवाजावळ उभे राहून प्रवास करावा लागतो. असा धोकादायक प्रवास करताना तोल गेल्यामुळे होणाऱ्या अपघातात काही प्रवासी जखमी किंवा मृत्युमुखी पडतात. काही प्रवासी गर्दी नसतानाही प्रवासा दरम्यान रेल्वेच्या डब्यांतील दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करतात आणि लोकलमधून पडून त्यांचा अपघात होतो, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. जानेवारी ते मार्च २०२२ मध्ये झालेल्या अपघातांमध्ये ११४ प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये मध्य रेल्वेवर ७७ आणि पश्चिम रेल्वेवर ३७ प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २०१ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये मध्य रेल्वेवरील ११६ आणि पश्चिम रेल्वेवरील ८५ जणांचा समावेश आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
५८ महिलांचे अपघात
गेल्या तीन महिन्यांमध्ये लोकल, मेल, एक्स्प्रेसमधून पडून झालेल्या अपघातातील मृत व जखमींमध्ये पुरुष प्रवाशांची संख्या जास्त आहे. २७७ पुरुष प्रवाशांचा अपघात झाला असून यामध्ये १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ५८ महिला प्रवाशांचाही अपघात झाला असून यापैकी १२ महिलांचा मृत्यू आणि ४६ महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.
कुर्ला, कल्याण हद्दीत सर्वाधिक अपघात
कुर्ला लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील कुर्ला ते मुलुंड दरम्यानच्या परिसरात सर्वाधिक अपघात होत आहेत. तीन महिन्यात १२ जणांचा मृत्यू आणि ११ जण जखमी झाले आहेत. कल्याणपासून कर्जतच्या आधी आणि कसारापर्यंत येणाऱ्या या हद्दीतही १६ प्रवाशांचा मृत्यू आणि २७ जण जखमी झाले आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, वांद्रे, वसई लोहमार्ग पोलीस हद्दीतही मोठय़ा प्रमाणात अपघातांची नोंद झाली आहे.
गर्दीतून पडून मृत्यू
लोकलमधील गर्दीतून पडून एका तरुणाचा नुकताच मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत तरुणाचे नाव रतन विश्वकर्मा असे होते. रतन हा नालासोपारा पूर्वेला आपल्या मोठय़ा भावासोबत राहात होता. २१ मार्चला तो अंधेरीला काही कामानिमित्त गेला. अंधेरीहून रात्री त्याने विरार जलद लोकल पकडली. लोकल गोरेगाव ते राम मंदिर स्थानकादरम्यान येताच तोल जाऊन तो रुळालगतच पडला. लोकलमधील गर्दीमुळे पडल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज लोहमार्ग पोलिसांनी वर्तविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year life threatening journey crowd continue three months 114 passengers died falling local express amy
First published on: 15-04-2022 at 01:18 IST