अपंग असूनही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवणारे फूट आर्टिस्ट म्हणजे बंदेनवाझ नदाफ आणि नदीम रियासत अली शेख यांनी जागतिक अपंग दिनाच्या दिवशी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये त्यांची कला सादर केली. ‘इंडियन असोसिएशन ऑफ माऊथ अँड फूट पेटिंग आर्टिस्ट्’च्या सहयोगाने हा उपक्रम राबवण्यात आला.

ओबेरॉय मॉलने बंदेनवाझ आणि नदीम यांना आपल्या कलेचे प्रदर्शन मॉलमध्ये करण्यासाठी विनंती केली होती. त्याप्रमाणे आपल्या कलेचे अनोखे दर्शन त्यांनी इथे जमलेल्या जनतेला घडविले. निसर्गाने परावलंबी केले असले तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर बंदेनवाझ आणि नदीम यांनी स्वावलंबनाचा मार्ग अवलंबला. त्यांच्याकडून प्रत्येक माणसाने शिकण्यासारखे आहे. आपल्या हिमतीच्या जोरावर दोघांनीही चित्रकलेवर प्रभुत्व मिळविले आहे. अपंगत्व आल्यानंतरही त्यावर मात करत स्वावलंबी जगण्याचा एक पायंडाच या दोघांनी घालून दिला आहे.

 

बंदेनवाझ हे जन्मतःच खांद्यापासून दोन्ही हात नसल्यामुळे अपंग आहेत. मात्र आपल्या जिद्दीने यावर मात करत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवित पदके मिळविली आहेत. लोकांसमोर लाईव्ह चित्र काढत दोघांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.समाजातील आपल्या अपंग मित्रांबरोबर अशा तऱ्हेने दिवस साजरा करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत असल्याचे यावेळी ओबेरॉय मॉलचे उपाध्यक्ष अनुपम टी. यांनी सांगितले.