मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार नीलेश राणे यांनी अचानकपणे जाहीर केलेली राजकीय निवृत्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अवघ्या २४ तासांत मागे घेतली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले मतभेद दूर करण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम करण्याच्या सूचना फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर राणे व चव्हाण यांच्यातील मतभेद मिटले आहेत.

हेही वाचा >>> पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केल्यास जशास तसे उत्तर! उद्धव ठाकरे यांना भाजपचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री चव्हाण आणि पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांशी असलेल्या मतभेदांमुळे आणि कार्यकर्त्यांच्या कामांसाठी शासकीय निधी मिळत नसल्याने नीलेश राणे यांनी समाजमाध्यमांवरून सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. फडणवीस यांनी नारायण राणे यांच्याशीही चर्चा केली. नीलेश यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या कामांसाठी जिल्हा निधीतून (२५-१५) पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही आणि त्यांना  मंजुऱ्याही मिळत नाहीत. नीलेश राणे हे विधानसभेसाठी इच्छुक असून ग्रामपंचायत व अन्य निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने आणि चव्हाण यांच्याकडून राजकीय कोंडी केली जात असल्याने राणे यांचे सहकारी नाराज होते. त्यामुळे नीलेश राणे यांनी  निवृत्ती जाहीर केली. त्याचे  तीव्र पडसाद उमटल्यावर चव्हाण यांनी बुधवारी नीलेश राणे यांची भेट घेऊन मनधरणी केली. या दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी चर्चा केली. कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने राणे रागावले होते. आता राणे यांनी सुचविलेल्या कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.