मुंबई : क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अमलीपदार्थ विक्रेता अचित कुमारसह नऊ जणांना विशेष न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणी विशेष न्यायालयाने यापूर्वी दोघांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर अचित कुमारसह नऊ जणांना शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) याप्रकरणी आर्यनसह २० जणांना अटक केली होती. त्यातील १४ जणांना आतापर्यंत जामीन मंजूर झाला आहे. अचितसह नूपुर सतिजा, गोमित चोप्रा, गोपालजी आनंद, समीद सेहगल, मानव सिंघलस, भास्कर अरोरा, श्रेयस नायर आणि इश्मित सिंह यांना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी ५० हजार रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर केला. तसेच या आरोपींनी आरोपपत्र दाखल केले जाईपर्यंत प्रत्येक सोमवारी दुपारी १ ते ४ वेळेत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी, खटला जलदगतीने निकाली निघावा यासाठी तपास यंत्रणेला सहकार्य करावे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, जामिनावर असेपर्यंत सारखाच गुन्हा करू नये अशा अटींवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2021 रोजी प्रकाशित
क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आणखी नऊ जणांना जामीन
द्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) याप्रकरणी आर्यनसह २० जणांना अटक केली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-10-2021 at 00:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine others granted bail in drug case on cruise akp