scorecardresearch

पीएनबी बँक फसवणूक प्रकरण : नीरव मोदीच्या मेहुण्याला अटकेपासून अंतरिम दिलासा

पीएनबी फसवणूक प्रकरणाचा सीबीआय, तर या घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी केली जात आहे

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणातील फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीचा मेहुणा मयांक मेहता हा आरोपी आहे की साक्षीदार हे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सांगू न शकल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी त्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. मात्र त्याच्या परदेश प्रवासाला न्यायालयाने तूर्त परवानगी दिलेली नाही.

पीएनबी फसवणूक प्रकरणाचा सीबीआय, तर या घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी केली जात आहे. सीबीआयच्या प्रकरणात मेहताला आरोपी बनवण्यात आलेले नाही. ईडी प्रकरणात मेहता आणि त्याची पत्नी पूर्वी माफीचे साक्षीदार झाले आहेत. त्यामुळे ईडीच्या मंजुरीनंतर मेहताला या प्रकरणात माफी देण्यात आली होती. तसेच विशेष न्यायालयाने त्याला हाँगकाँग येथील घरी जाण्याची परवानगी दिली होती; परंतु मेहता हा आपण तपास करत असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणातही आरोपी असून त्याला ही परवानगी दिली जाऊ शकत नसल्याची भूमिका सीबीआयने घेतली. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी सीबीआयचे विशेष वकील राजा ठाकरे यांनी ईडीने केलेला तपास आणि सीबीआयने केलेल्या तपासात फरक असल्याचा दावा केला. ईडी तपास करत असलेल्या गुन्ह्यात अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब पुरावा मानला जातो. त्यांना अर्ध-न्यायिक अधिकार असल्याने हे शक्य आहे. सीबीआय तपासाच्या बाबतीत असे करणे शक्य नाही. सीबीआयचा खटला हा पुराव्यांवर आधारित असतो. त्यामुळे ईडी प्रकरणात मेहता याला साक्षीदार करण्यात आल्याने सीबीआयच्या प्रकरणातही त्याला साक्षीदार करण्याची त्याची मागणी मान्य करता येणार नाही, असे ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले.

तथापि, सीबीआयकडून अद्याप या प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि त्यामुळे मेहता हा या प्रकरणात नेमका साक्षीदार की आरोपी आहे हे सद्य:स्थितीला स्पष्ट केले जाऊ शकत नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-07-2022 at 05:52 IST

संबंधित बातम्या