मुंबईमधील प्रसिद्ध गणपती मंडळ असणाऱ्या ‘लालबागचा राजा’च्या मंडपामध्ये काल पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने मंडपामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गर्दीला आवरत असताना खजिनदार मंगेश दळवी यांना पोलिसांचा धक्का लागल्याने हा वाद निर्माण झाला. दर्शनाच्या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलीस गर्दीवर नियंत्रण मिळवत असताना हा धक्का लागला होता. दोघेही अगदी हमरी-तुमरीवर आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याच वादावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मंडळाची पाठराखण करणारे आणि पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काही ट्विट केले आहे.

याप्रकरणी ट्विटवरून आपली भूमिका मांडताना नितेश राणेंनी लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम केले जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘लालबागचा राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करण्यापेक्षा दुसरी बाजू ही ऐकली पाहिजे. पोलिस ज्या पदतीने कार्यकर्त्यांना हाताळत आणि मारत आहेत तेही चुकीच आहे. पुढे त्यांनी थेट हा गणपती नक्की कोणाचा आहे असा सवाल उपस्थित करत ‘लालबागचा राजा पोलिसांचा का स्थानिक कार्यकर्त्यांचा हे कळल नाही आहे?’ असंही म्हटलं आहे.

याशिवाय नितेश राणेंना याचसंदर्भात टॅग केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी पोलिसांची अरेरावी सुरु असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांवर हात उचलणे चुकीचे आहे पण तिथे (लालबागचा राजा परिसरात) पोलिसांची अरेरावी खूप चालू आहे असेही ते एका ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांची बाजू घेताना राणे यांनी कार्यकर्ते पण सामन्य लोकच आहेत. ते जिथे चुकतील तिथे नक्कीच त्यांना सांगेल पण उगच सगळ्यांची बदमानी नको. कार्यकर्तेही तेथे रात्रं दिवस सेवाच करत आहेत असं त्यांनी ट्विट केलं आहे.

 

राजाच्या दरबारातील वाद पहिल्यांदाच नाही

याआधीही लालबागचा राजाच्या मंडपामध्ये काहीवेळा कार्यकर्त्यांकडून भक्तांना मिळणाऱ्या वागणुकीवरुन लालबागच्या राजा मंडळावर टीका झाली होती. २०१३ रोजी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना मिळणारी उद्धट वागणूक आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या धक्काबुक्कीची गृहविभागाने गंभीर दखल घेत भक्तांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांनी दिले होते. त्याशिवाय राजाच्या पायावर माथा टेकवणाऱ्या महिला भाविकांना हुसकावणाऱ्या कार्यकर्त्याचाही व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.