गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या सत्ता स्थापनेचा पेच आज ( शनिवारी) अखेर सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपा आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे”, असं ट्विट करुन नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 23, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.