सदोष ‘नमुना उत्तरपत्रिके’मुळे (मॉडेल आन्सरशीट) ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या विषयात नापासचा ठपका बसलेल्या ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट’च्या (बीएमएस) विद्यार्थ्यांचे भवितव्य मुंबई विद्यापीठ आणखी दोनतीन दिवसांनी ठरविणार आहे. गुरुवारी दिवसभर काथ्याकूट करूनही कोणताही ठोस निर्णय न घेता परीक्षा मंडळाची बैठक गुंडाळण्यात आली. विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे या बैठकीनंतर प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी सांगितले.
बीएमएसच्या ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’च्या पाचव्या सत्रासाठी झालेल्या परीक्षेचे मूल्यांकन सदोष ‘नमुना उत्तरपत्रिके’च्या आधारे झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे या वर्षी बीएमएसमध्ये तब्बल ५० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६० गुणांसाठी ही लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या विषयासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षकांकडे पाठविलेल्या नमुना उत्तरपत्रिकेत चुका असल्याची परीक्षकांची तक्रार होती. काही परीक्षकांनी ही चूक परीक्षा विभागाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर परीक्षा विभागाने त्यात दुरुस्ती करून सुधारित नमुना उत्तरपत्रिका पाठविली. मात्र तोपर्यंत मूल्यांकनाचे काम पूर्ण होत आले होते. त्यामुळे, या ठरावीक विषयाचा निकाल कमालीचा खाली आला.
या विषयात तब्बल ५० टक्के विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर परीक्षा विभागाने वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. मधू नायर यांना चौकशी करण्यास सांगितले. त्यांनी सर्व प्रकरणाची माहिती घेऊन ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या विषयाच्या नमुना उत्तरपत्रिकेत चुका असल्याचे मान्य केले होते. ६० पैकी ३५ गुणांसाठी असलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये व उत्तरांसाठी ठरवून देण्यात आलेल्या गुणांच्या आकडेवारीत चुका असल्याचा आक्षेप होता.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘फायनान्शियल मॅनेजमेंट’च्या नापास विद्यार्थ्यांबाबत ठोस निर्णय नाही
सदोष ‘नमुना उत्तरपत्रिके’मुळे (मॉडेल आन्सरशीट) ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या विषयात नापासचा ठपका बसलेल्या ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट’च्या (बीएमएस)
First published on: 14-03-2014 at 12:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No concrete decision on fail students of financial management