लाखमोलाच्या दहीहंडय़ा लावून स्वत:ला मिरवून घेण्याची चढाओढ ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकीकडे सुरू असतानाच या उत्सवी परंपरेला सामाजिक जाणिवेची जोड देणारी अंध, अपंग, कर्णबधीर आणि मूक विद्यार्थ्यांची दहीहंडी मात्र आर्थिक मदतीअभावी बंद पडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी एक लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. मात्र, लाखोंच्या हंडय़ा रचून आपल्या ‘श्रीमंती’चे दर्शन घडवणाऱ्या ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी याबाबत आपल्या मनाची गरिबी दाखवून दिली आहे.
शिवसेनेचे उपशहरप्रमुख विलास ढमाले यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दहीकाल्याच्या आदल्या दिवशी शिवाजी मैदानात ही हंडी आयोजित केली जाते. या उत्सवात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातून सुमारे पाचशेहून अधिक अपंग विद्यार्थी सहभागी होत असतात. या विद्यार्थ्यांना अल्पोपहार, जेवण तसेच भेटवस्तूंची व्यवस्थाही मंडळामार्फत केली जाते. येथील बाळगोपाळ मित्र मंडळातर्फे गेली २८ वर्षे या उत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून हे आयोजन शिवसेनेचे उपशहरप्रमुख ढमाले यांनी आपल्या खांद्यावर घेतले.
यंदाच्या वर्षी तब्बल १७ शाळांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी नोंद केली होती. या आयोजनासाठी सरासरी दीड लाख रुपयांचा खर्च येणार होता. यासाठी ढमाले यांनी शिवसेनेच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला. मात्र,  यापैकी कोणीही त्यांना मदतीचा हात पुढे केला नाही. त्यामुळे ही दहीहंडीच बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

लाखमोलांच्या हंडय़ा..
ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने गेल्यावर्षी २५ लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली होती. आमदार राजन विचारे तलावपाळी परिसरात ‘लेझर शो’ आयोजित करत लाखो रुपयांचा दौलतजादा करतात. तर आमदार एकनाथ शिंदे यांचा टेंभी नाक्यावरील उत्सवात सोन्याची हंडी उभारली जाते. रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानाच्या उत्सवात सेलीब्रेटींना नाचवले जाते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे यंदा २५ लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे.