चेंबूर रेल्वेस्थानकाशेजारी पालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कॉलेजच्या इमारतीमध्ये आपले वास्तव्य नसल्याचा दावा माजी महापौर व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केला आहे. मात्र, हॉलच्या उत्पन्नातून शाळा व महाविद्यालय चालवले जात असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.
पालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या पाच मजली इमारतीतील तळमजला आणि पहिला-दुसरा माळा आलिशान वातानुकूलीत हॉलसाठी देण्यात आला आहे. प्रामुख्याने लग्नासाठी या हॉलचा वापर होतो. पहिल्या मजल्यावर केटरिंग कंपनीचे कार्यालयही आहे. शेजारच्या आरक्षित पालिका भूखंडावर बिनदिक्कत पार्किंग केले जाते. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्यांवर संस्थेचे कार्यालय असून याच जागेचा वापर हंडोरे वास्तव्यासाठीही करतात. उर्वरित भागात शाळा, महाविद्यालय चालविले जाते. याबाबत हंडोरे यांच्याशी संपर्क साधला असता, हॉलमधून येणाऱ्या उत्पन्नातून साडे तीन हजार विद्यार्थ्यांचे शाळा आणि महाविद्यालय चालविले जाते. खर्चाशी हातमिळवणी करताना नाकीनऊ येत आहेत. आपण येथे राहत नाही. आपले घर समोर आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र आपले काही कार्यकर्ते येथे राहतात. तसेच संस्थेचे कार्यालय असल्याचेही त्यांनी मान्य केले.
इमारतीशेजारील पालिकेचा भूखंड हा विकास प्रस्ताव रस्त्यासाठी आरक्षित आहे. आम्ही त्याचे संरक्षण करतो. केवळ लग्नासाठीच नव्हे तर इतरही अनेक उपक्रमासाठी काही वेळा मोफत हा हॉल उपलब्ध करून दिला जातो. शाळा व महाविद्यालयाचे कार्यक्रमही याच हॉलमध्ये होतात. गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आणि महाविद्यालय पर्वणी आहे.
चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No home in that building chandrakant handore
First published on: 13-06-2014 at 04:47 IST