मुंबई : ‘एअर इंडिया’ने त्यांच्या ‘बोइंग ७८७’ आणि ‘बोइंग ७३७’ या विमानांच्या इंधन नियंत्रक स्विचची (एफसीएस) तपासणी पूर्ण केली आहे. त्यात कुठलीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही. ‘एअर इंडिया’ने ही माहिती दिली. इंधन नियंत्रक स्विच विमानांच्या इंजिनना होणारा इंधनपुरवठा नियंत्रित ठेवतो.
नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) गेल्या आठवड्यात बोइंग विमाने ज्या विमान कंपन्या चालवितात, अशा सर्व कंपन्यांना बोइंग विमानांच्या ‘एफसीएस’ची २१ जुलैपर्यंत तपासणी करण्याचे आदेश दिले होते. अहमदाबाद विमान अपघाताच्या संदर्भात ‘विमान अपघात चौकशी ब्यूरो’च्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात अपघातापूर्वी विमानाचा इंधनपुरवठा बंद झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर ‘डीजीसीए’ने इंधन नियंत्रक स्विचच्या तपासणीचे आदेश जारी केले होते.
‘एअर इंडिया’कडे ‘बोइंग ७८७’, तर ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ ‘बोइंग ७३७’ विमान वापरते. ‘एअर इंडिया’खेरीज ‘इंडिगो’, ‘स्पाइसजेट’, ‘अकासा’ या विमानकंपन्या ‘बोइंग’ची विमाने वापरतात. देशभरात एकूण १५० ‘बोइंग-७३७’ आणि ‘बोइंग ७८७’ विमाने विविध कंपन्या वापरतात.
एअर इंडियाचे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान १२ जून रोजी कोसळून झालेल्या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर विमान ज्या ठिकाणी कोसळले, तेथील १९ जणांचा मृत्यू अपघातात झाला.
विमानाच्या ‘ऑक्झिलिअरी पॉवर युनिट’ला आग नवी दिल्ली: ‘एअर इंडिया’चे ‘ए-३२१’ विमान दिल्ली विमानतळावर मंगळवारी दुपारी उतरल्यानंतर विमानाच्या ‘ऑक्झिलिअरी पॉवर युनिट’ला आग लागण्याची घटना घडली. विमान हाँगकाँगहून नवी दिल्लीला आले होते. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत. ‘एअर इंडिया’च्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले, आग कशी लागली, याची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे.