अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी अजून कोणतेही पुरावे नाहीत – परमबीर सिंग

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

parambir - anil

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितलंय. आयोगाच्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली.

या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करूनही, ते आतापर्यंत हजर झालेले नाही. आयोगाने परमबीर सिंग यांना तीनदा दंड ठोठावला होता. जून महिन्यात ५ हजार आणि इतर दोनदा गैरहजर राहिल्याबद्दल प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला होता.

या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी चौकशी आयोगासमोर हजेरी लावली. ते म्हणाले, “परमबीर सिंग यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे देण्यास नकार दिला आहे. तसेच सिंग उलट तपासणीसाठीही तयार नाही,” असे शिशिर हिरे यांनी सांगितले. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.

गेल्या आठवड्यात, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. या वर्षी मार्चमध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून होमगार्डमध्ये बदली झाल्यानंतर काही दिवसांनी सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दावा केला होता की अनिल देशमुख पोलिस अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बारमालकांकडून पैसे गोळा करण्यास सांगत असे. त्यांच्या या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी एप्रिलमध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, याच प्रकरणात सध्या अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No more evidence to share against anil deshmukh says parambir singh hrc

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या