लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय मल्ल्याला मुंबईतील तुरुंगात कोणताही धोका नाही. मुंबईतील तुरुंगात विजय मल्ल्याच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होईल यावर विश्वास ठेवण्यासाठी कोणताही आधार नाही असे निकाल वाचन करताना वेस्टमिन्सटर कोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थर रोड कारागृहातील बराक नंबर १२ मधील परिस्थिती देखील समाधानकारक आहे असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. १९२५ रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची ८०४ कैद्यांची क्षमता आहे.

बराक क्रमांक १२ मध्ये तीन खोल्या असून यामधील एकामध्ये शीन बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला ठेवण्यात आलं आहे. तर तिसरा तुरुंग सध्या स्टोअर रुम म्हणून वापरला जात आहे.

विजय मल्ल्याला ठेवण्यात येणारी जागा सामान्य कैद्यांपासून दूर असणार आहे. सामान्य कैदी आणि त्याच्यात एक मोठी सुरक्षा भिंत असणार आहे. या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे असून, पोलिसांचा सतत पहारा असतो. कसाबच्या सुरक्षेसाठी बराक क्रमांक 12 ला आग आणि बॉम्बपासून सुरक्षित करण्यात आलं होतं. पहिल्या माळ्यावर जिथे कसाबला ठेवण्यात आलं होतं तिथे सध्या २६/११ चा हॅण्डलर अबु जिंदालला ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत अजूनही काही कैदी आहेत.

विजय मल्ल्या हाय प्रोफाइल आहे या एकमेव कारणासाठी बराक क्रमांक १२ ची निवड करण्यात आलेली नाही, तर जवळच डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असल्याने ही निव़ड करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. १०० मीटर अंतरावर जेलमधील दवाखाना असून तिथे तीन डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असतात. ५० मीटर अंतरावरच अंडा सेल आहे जिथे मोठ्या गुन्हेगारांना ठेवलं जातं. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कास्कर आणि गँगस्टर अबू सालेम यांनाही एकदा येथे ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान विजय मल्ल्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकतो. अपिल करण्यासाठी विजय मल्ल्याला १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर होऊ शकतो. न्यायालयाच्या निर्णयावर सीबीआय प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही लवकरात लवकर मल्ल्याला परत आणू याबद्दल सकारात्मक आहोत. सीबीआयचे आपलं सामर्थ्य आहे. आम्ही या प्रकरणावर खूप मेहनत घेतली आहे. प्रत्यार्पणासाठी पुरावे सादर करताना आम्हाला आत्मविश्वास होता असं म्हटलं आहे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No risk to vijay mallya in mumbai jail uk court
First published on: 10-12-2018 at 21:44 IST