‘सर्व गोविंदा पथकांनी विमा काढावा व पोलीस परवानगीशिवाय दहीहंडी उत्सवात उतरू नये’, असे आवाहन करतानाच ‘नियम मोडणाऱ्या पथकांवर कोरवाई झाल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पथकाचीच राहील,’ अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे.
दहीहंडी उत्सवाच्या दिवशी गोविंदा पथकांनी १४ वर्षांखालील मुलांना वरच्या थरावर चढवू नये. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड आणि प्रोटेक्टर इत्यादी सुरक्षा साधनांचा वापर करावा, अशा सूचना समितीने पथकांना दिल्या आहेत.
मुंबई शहर तसेच उपनगरातील दहीहंडीच्या दिवशी गल्लीबोळातील नोंदणी नसलेल्या पथकोंमध्ये होणारे अपघात आणि रस्त्यावर वाहनांनी होणारे अपघातही दहीहंडीमुळे झाल्याचे दाखवले जाते. मात्र सुरक्षा साधनांचा वापर करण्याच्या सूचना समिती करत असल्याने गेल्या काही वर्षांत वरच्या थरांवरून पडून होणारे अपघात कमी झाले आहेत, असा दावा समितीने केला आहे.
हंडी फोडायला आलेल्या पथकाची पोलीस परवानगी तसेच वरच्या थरावर चढणाऱ्या मुलाचा जन्मदाखला पाहण्याची जबाबदारी आयोजकांची असल्याचे समितीने सांगितले आहे.
कोल्हापूर, सांगलीला आलेल्या पुरामुळे दहीहंडी रद्द करून पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे काही आयोजकांनी जाहीर केले आहे. यावर ‘अशा परिस्थितीत गणेशोत्सव साजरा होणार असेल तर, दहीहंडी का नाही?’ असा प्रश्न समितीच्या गीता झगडे यांनी उपस्थित केला.