मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी करून उपराष्ट्रपती पदासाठी भाजप आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली असली तरी ते आमच्या विचाराचे नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असतानाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात अटक करण्यात आली होती याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकमताने बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करून उमेदवारी अर्ज ही दाखल केला आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरध्वनी करून पाठिंब्याची विनंती केली असता मी त्यांना पाठिंबा देणे शक्यच नसल्याचे स्पष्ट केले. आमचा पाठिंबा हा इंडिया आघाडीला आहे.
राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत, ते झारखंड राज्याचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते. त्यावेळी राजभवनात सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. राज्यपालांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. सोरेन यांनी राजभवनात अटक न करता रस्त्यावर, स्वतःच्या कार्यालयात किंवा घरी अटक करावी, अशी विनंती केली होती. तरीही त्यांना राजभवनात अटक झाली. राजभवनात अटक करण्यास राधाकृष्णन यांनी विरोध करायला हवा होता. सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो, याचे हे उदाहरण आहे, अशा लोकांना मतदान करणे योग्य वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी राधाकृष्णन यांना मतदान करण्यास स्पष्ट नकार दिला.
बिहारमध्ये राहुल गांधी यांना मोठा प्रतिसाद
निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कामांना आम्ही विरोध केला आहे. त्या विरोधात दिल्ली येथे ३०० खासदार रस्त्यावर उतरले होते. तिथे आम्हाला अटक करण्यात आली. बिहारमध्ये निवडणूक आयोगाचे जे काम चालले आहे, त्याला लोकांचा विरोध आहे. सध्या बिहारमध्ये राहुल गांधी दौरे करीत आहेत, त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बिहार राज्य आर्थिक अडचणीत असले, तरीही ते राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. लोकांचा विरोध असतानाही निवडणूक आयोग योग्य भूमिका घेत नाही. त्यामुळे देशभर आयोगाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध केला जाईल, असेही पवार म्हणाले. .