गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे दोन पक्ष या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांचा गट घेऊन भाजपाबरोबर जातील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आज ( १८ एप्रिल ) अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र असल्याचा खळबळजनक दावा ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने केला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हटलं वृत्तपत्रात?

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं की, “अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या सह्यांचं पत्र आहे. हे पत्र अजित पवार राज्यपालांना देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवलं, तर अजित पवार हे पाऊल उचलतील,” असेही वृत्तपत्रात सांगितलं. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : राष्ट्रवादीत सगळं काही ऑल इज वेल आहे का? धनंजय मुंडेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाले..

अजित पवार म्हणाले, “माझ्याबद्दल दाखवण्यात येत असलेल्या बातम्यांमध्ये यथाकिंचतही तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या घेतलं असल्याचं दाखवण्यात येत आहे. पण, अशा सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, पक्षातच राहणार आहोत. त्यामुळे या बातम्यांना कोणत्याही प्रकाराचा अधिकार नाही.”

हेही वाचा : अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देताना म्हणाले, “ही चर्चा…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नेहमीप्रमाणे मी विधिमंडळातील कार्यालयात बसतो. मंगळवार आणि बुधवार आमदारांच्या कमिटीची बैठक असते. अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामानिमित्त येत असतात. त्यामुळे आज आलेले आमदार मी विधिमंडळातील कार्यालयात असल्याने भेटायला आले होते. यामध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,” असेही अजित पवारांनी सांगितलं.