मुंबई : शैक्षणिक शुल्क न भरल्याने इयत्ता पाचवी ते दहावीतील एकूण ३० विद्यार्थ्यांचे शिक्षण शाळेने बंद केल्याप्रकरणी दादरमधील नामांकित ‘आयईएस मॉडर्न इंग्लिश स्कूल’ला महाराष्ट्र बालहक्क आयोगाने नोटीस बजावली आहे.
शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या तक्रारी येताच महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. माहितीच्या अधिकाराअंतर्गत शाळेतील ३० विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबल्याची गंभीर बाब समोर आली. या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे सादर करून शाळेवर त्वरित कारवाई करण्याची मागणी दळवी यांनी केली. त्यानुसार आयोगाने ‘आयईएस’ शाळेला नोटीस बजावली आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद केल्याबाबत विस्तृत अहवाल व सद्य:स्थितीची माहिती सात दिवसांच्या आत बालहक्क आयोगाला सादर करावी असे त्यात नमूद केले आहे. यासंदर्भात दुसरी बाजू ऐकण्यासाठी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
खासगी शाळांची मनमानी
शैक्षणिक शुल्क भरले नसल्यास कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण रोखू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालय आणि शिक्षण विभागाने दिले आहेत. परंतु हे निर्देश धुडकावून खासगी शाळा शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. ही बाब अतिशय गंभीर व चिंताजनक असून खासगी शाळांमध्ये शुल्कामुळे अजून किती विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे याची चौकशी शिक्षण विभागाने करायला हवी, तसेच त्या शाळांवर कारवाई करून विद्यार्थ्यांचे शिक्षण तातडीने सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने केली आहे.