आम्ही केवळ बदल हवा या एकमेव उद्देशाने मतदान केले. सद्य:परिस्थितीत स्थिर सरकार देणारा पर्याय म्हणूनच आम्ही याकडे बघतो. यात एकहाती विजय मिळवणाऱ्यांवरच्या गाढ विश्वासाचा भाग कमी आणि संधी देण्याचा भाग जास्त आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवेल असा विवेकी विरोधी पक्ष या क्षणी आवश्यक आहे.. ही सडेतोड मते आहेत आजच्या तरुण पिढीची.
पहिल्यांदाच बोटाला शाई लावून घेणाऱ्या तरुण मतदारांनी कोणत्या दृष्टिकोनातून मतदान केले, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता व्हिवा’ने त्यांच्याशी संवाद साधला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांतील १८ ते २५ वयोगटातील तरुणांना या संदर्भात बोलते करण्यात आले.
या निवडणुकांमध्ये तरुणाईने उचलून धरलेला पक्ष म्हणून आम आदमी पक्षाची चर्चा होती. प्रत्यक्षात मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालावरून ‘आप’ला फारसे यश मिळालेले दिसत नाही. त्याबद्दल तरुणाई फार विचारपूर्वक बोलते. ‘आजच्या घडीला ‘आप’ सरकार देऊन शकेल अशी खात्री वाटत नाही. ‘आप’चा पर्याय हा भविष्यकाळासाठी आहे. आता अपेक्षा स्थिर सरकारची असल्याने जाणीवपूर्वक मतदान केले,’ असे असले तरी भ्रष्टाचाराला विरोध हा अजेंडा असणारा ‘आप’ अजूनही शहरी तरुणाईला जवळचा वाटतो. ही निवडणूक धार्मिक नव्हे, तर विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे या तरुणाईला वाटते. नव्या सरकारकडून प्रामुख्याने शैक्षणिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रात सुधारणा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
सविस्तर वृत्तांत आणि तरुणांच्या प्रतिक्रिया आजच्या व्हिवा पुरवणीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now get stable government as get chance
First published on: 16-05-2014 at 02:33 IST