सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईमध्ये काही कडक अटींद्वारे डान्सबार सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली शुक्रवारी रात्री उशिरा जारी करण्यात आली. या नियमावलीनुसार, डान्सबारमधील सीसीटीव्ही कॅमेराचे प्रक्षेपण थेट पोलीस नियंत्रण कक्षात उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर डान्स बारमध्ये नृत्यांगनांवर पैशांची उधळण करता येणार नाही. बारबालांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली असून ग्राहक आणि बारबालांमध्ये अंतर ठेवावे लागणार आहे.
मुंबईमध्ये डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती उठवत डान्स बारना परवाने देण्याचे आदेश दिले. त्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने काही कडक नियमांनुसार डान्स बार पुन्हा सुरू करण्यास परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमावलीनुसार एका डान्स बारमध्ये केवळ चार नृत्यांगनांनाच नृत्य सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बारबालांसाठी स्वतंत्र रंगमंच उभारावा लागणार असून तो कठडय़ाने बंदिस्त करावा लागेल. डान्स बारमध्ये येणारे ग्राहक आणि नृत्य सादर करणाऱ्या बारबाला यांच्यामध्ये पाच फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. पूर्वी डान्स बारमध्ये नृत्यांगनांवर नोटांची उधळण केली जात होती. मात्र आता या प्रकाराला चाप लावण्यात आला असून ग्राहकांना नृत्यांगनांवर नोटा उडविता येणार नाहीत. त्याचबरोबर आणखीही काही अटींची पूर्तता डान्स बारना करावी लागणार आहे.