देशातील वीजनिर्मितीची वाढती गरज लक्षात घेता अणुउर्जा व अन्य पर्यायी उर्जास्त्रोतांचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वानीच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असा सूर ‘लोकसत्ता’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या चर्चासत्रात मंगळवारी व्यक्त करण्यात आला. वीजखरेदीचा दर नियंत्रणात ठेवून किंवा स्वस्त वीजखरेदी करण्यास प्राधान्य देऊन शेतकरी व अन्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट केल्याशिवाय निवासी ग्राहक आणि उद्योगांसाठीचा वीजदर कमी करता येणार नाही, असा स्पष्ट सूरही आज उमटला.
‘उर्जा निर्मिती-पर्यायी मार्ग आणि त्यातील आव्हाने’ या विषयावरील सत्राने मंगळवारच्या चर्चासत्राला सुरुवात झाली. अणुऊर्जा शिक्षण परिषदेचे सचिव एस. के. मल्होत्रा, ‘आयआयटी’चे प्राध्यापक शाम असोलेकर, ‘आर्टी’चे अध्यक्ष आनंद कर्वे हे या सत्रात सहभागी झाले. तर वीजखरेदीचा दर नियंत्रणात ठेवून किंवा स्वस्त वीजखरेदी करण्यास प्राधान्य देऊन शेतकरी व अन्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट केल्याशिवाय निवासी ग्राहक आणि उद्योगांसाठीचा वीजदर कमी करता येणार नाही, असे मत ‘दर आणि अनुदान’ या चर्चासत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. उर्जा खात्याचे प्रधान सचिव अरविंद सिंह, वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे आणि उर्जा प्रबोधिनीचे मुंबई समन्वयक पुरुषोत्तम कऱ्हाडे सहभागी झाले.
छोटे छोटे प्रयोग करुन वीजनिर्मिती करावी. हे प्रयोग मोठय़ा प्रमाणावर केल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर वीजबचत होईल, असा विश्वास प्रयोगशील ऊर्जावंतांनी व्यक्त केला. ‘प्रयोगशील उर्जावंत’ या सत्रात सौर खेडय़ाचा प्रयोग करणारे अरुण देशपांडे, अपारंपरिक उर्जा उत्पादनांचे संशोधक केदार पाठक आणि वर्षांसूक्तच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रलेखा वैद्य सहभागी झाले. हे तिघेजण वीज निर्मितीचे प्रयोग करून वीज व्यवस्थेवरील भार कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.