वैद्यकीय अभ्यासक्रमात यापुढे कौमार्य चाचणीसंबंधित अवैज्ञानिक माहितीही नाही

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : कौमार्य चाचणीसह आता एलजीबीटीक्यूविषयी अपमानकारक किंवा भेदभावजनक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमांमधून अखेर वगळण्यात येणार आहे. अवैज्ञानिक माहिती वगळून नवा वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) समिती स्थापन केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमध्ये कौमार्य चाचणीबाबत अवैज्ञानिक तसेच न्यायवैद्यकशास्त्राच्या दृष्टीने चुकीची माहिती असल्याचे आढळले आहे. तसेच एलजीबीटीक्यूविषयी अपमानकारक माहितीही पुस्तकांमध्ये दिली आहे.

ही अवैज्ञानिक, अपमानकारक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमधून वगळण्याच्या सूचना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सर्व लेखकांना दिल्या आहेत. तसेच कौमार्य चाचणी आणि एलजीबीटीक्यूविषयी अवैज्ञानिक, अपमानकारक आणि भेदभाव करणाऱ्या माहितीचा उल्लेख असलेल्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश करू नये असे आदेशही वैद्यकीय संस्थाना दिले आहेत.

लैंगिकतेबाबत वैद्यकीय माहिती, तक्रारी, लक्षणे, तपासणी, निष्कर्ष कसे नोंदवावेत हे एमबीबीएस किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविताना एलजीबीटीक्यूविषयी अपमानकार, भेदभाव करणारी माहिती देऊ नये, अशा सूचनाही ‘एनएमसी’ने वैद्यकीय संस्था किंवा महाविद्यालयांना दिल्या आहेत.

समितीची स्थापना

सुधारित अभ्यासक्रमासाठी समिती सुधारित वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एनएमसीने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. कौमार्य चाचणीविषयी अवैज्ञानिक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमांतून वगळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘‘कौमार्य चाचणी आणि एलजीबीटीक्यूविषयी अवैज्ञानिक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आहे. समलैंगिकता अनैसर्गिक आहेत,  तसेच हा मानसिक आजार असल्याचेही नमूद केले आहे. अशा स्वरूपातील ही सर्व माहिती वगळून  सुधारित अभ्यासक्रम या समितीने तयार केला असून लवकरच तो लागू करण्यात येईल’’, असे डॉ. खांडेकर यांनी सांगितले.

मानसिक समस्यांचाही समावेश हवा या समाजाच्या शारीरिक जशा अनेक समस्या आहेत, तशाच मानसिक समस्याही खूप आहेत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या या व्यक्तींना मानसिकदृष्टय़ाही समजून घेणे आवश्यक आहे. याचा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये कुठेही समावेश केलेला नाही. अभ्यासक्रमांमधून केवळ अपमानकरक माहिती वगळणे पुरेसे नाही, तर त्यादृष्टीने त्यांचे प्रशिक्षणही होणे आवश्यक आहे. केवळ डॉक्टरच नव्हे तर इतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत तृतीयपंथी कार्यकर्त्यां गौरी सावंत यांनी व्यक्त केले.