नियोजनासाठी बैठकांना सुरूवात, शासन निर्णयाची प्रतीक्षा

मुंबई : गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या करोना लाटेचे पडसाद अधिक तीव्र असल्याने येणाऱ्या काळातील उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जातील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यातही गणेशोत्सव यंदा कसा होणार याची चर्चा केवळ मंडळांमध्येच नाही तर जनमानसांतही सुरू आहे. मेअखेरीस बहुतांशी मंडळांच्या बैठका होणार असून काही मंडळे यंदाही साधेपणाने उत्सव करणार आहेत, तर काही मंडळांचा मात्र मोठय़ा मूर्तीसाठी आग्रह सुरू आहे.

अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन झाले की दुसऱ्या दिवसापासून आगामी गणेशोत्सवाची लगबग कार्यकर्त्यांमध्ये सुरू होते. मूर्ती, सजावट, आर्थिक नियोजन याचे ढोबळमानाने अंदाज बांधले जातात आणि मे महिन्याच्या अखेरीस या संकल्पनांना आकार देण्याचे काम सुरू होते. गेल्या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने केल्यानंतर यंदा तरी उत्सवाला पूर्वीचे दिवस येतील अशी आशा मंडळांना होती. परंतु दिवसेंदिवस करोनाचा कहर वाढत चालल्याने या आशेवर विरजण पडले आहे.

करोनामुळे अनेक मंडळांचे कार्यकर्ते दगावले आहेत, तर कुठे स्थानिक विभागातील महत्त्वाच्या व्यक्ती गमावल्या आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य मंडळांनी जोखले आहे. सध्याची परिस्थती बिकट आहे, परंतु उत्सवाकडेही लोकांचे लक्ष लागून असल्याने सरकारने लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. गर्दी करून परिस्थिती आणखी हाताबाहेर घालवण्याचा समितीचा मानस नाही. फक्त उत्सव खंडित होता कामा नये. म्हणून सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पूर्णत: पाठिंबा असेल, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव गिरीश वालावालकर यांनी सांगितले.

यंदाही आर्थिक संकट

करोनामुळे यंदाही गेल्या वर्षीसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योग-व्यवसायांना, नोकऱ्याना खीळ बसल्याने लोकांकडे पैसे नाहीत. बाजार आणि दुकाने बंद असल्याने बाहेरून येणारी वर्गणीही यंदा मिळणार नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन कसे करावे असा मंडळापुढे प्रश्न आहे.

पहिली घोषणा

‘परळचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (नरे पार्क ) यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष असूनही कुठलीही वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.    नियमावलीप्रमाणे उत्सवा साजरा करता सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम राबवणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.