हार्बर मार्गावरील गाडय़ांचे डबे वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांत वाद; जुन्या गाडय़ा भंगारात काढण्याला काही अधिकाऱ्यांची पसंती
हार्बर मार्गावरील प्रवाशांना १२ डब्यांच्या गाडय़ांची प्रतीक्षा असताना मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे त्यात अडचण येण्याची शक्यता आहे. डीसी-एसी परिवर्तन आणि १२ डब्यांची गाडी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हार्बर मार्गावर अमलात येतील, असे सांगितले जात आहे. मात्र हार्बर मार्गावरील गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवण्याऐवजी या मार्गावर धावणाऱ्या जुन्या गाडय़ा भंगारात काढण्याला काही अधिकारी पसंती देत आहेत. तर काहींच्या मते प्रवाशांना दिलासा देण्यासाठी नऊ डब्यांच्या गाडय़ा १२ डब्यांच्या करून चालवण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
हार्बर मार्गावर डीसी-एसी परिवर्तन आणि १२ डब्यांच्या गाडय़ा हे दोन्ही प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे मध्य रेल्वेने याआधीच स्पष्ट केले होते. डीसी-एसी परिवर्तनाच्या कामात काहीच अडथळा नाही. मात्र १२ डब्यांच्या गाडय़ा चालवायच्या, तर अधिक डब्यांसाठी अधिक गाडय़ा मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेकडून आतापर्यंत मध्य रेल्वेवर १२ गाडय़ा दाखल झाल्या आहेत. तर मार्चपर्यंत आणखी १२ गाडय़ा येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी २४ गाडय़ा उपलब्ध असतील. असे असताना काही अधिकाऱ्यांच्या मते या २४ गाडय़ा हार्बर मार्गावरील गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी वापरण्याऐवजी मध्य रेल्वेवर २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवेत असलेल्या गाडय़ा भंगारात काढणे अधिक आवश्यक आहे. या गाडय़ा अचानक बिघडत असल्याने परिचालनात अडचण येते. तसेच प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीनेही या गाडय़ा अधिक काळ सेवेत असणे धोकादायक आहे, असा युक्तिवाद काही अधिकारी करत आहेत.
तर, रेल्वेतील काही अधिकाऱ्यांच्या मते या जुनाट गाडय़ा अजूनही उत्तम स्थितीत असून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रथम डब्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. डब्यांची संख्या वाढवल्यावर असलेल्या फेऱ्यांच्या संख्येतही प्रवासी वहन क्षमता वाढणार आहे. परिणामी प्रवाशांना दिलासा मिळेल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा तिढा मार्चपर्यंत सुटला नाही, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळण्यास आणखी दिरंगाई होण्याची शक्यता आहे.