विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरचा दावा; प्रसारवेगामुळे काळजी आवश्यक

गेला दीड आठवडा जगभरातील नागरिकांच्या मनात धडकी भरविणारा ‘ओमायक्रॉन’ हा करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू वेगाने प्रसार करीत असला, तरी तो कमी घातक असल्याचा दावा या विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरने केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर अँजलिक कोएट्झी या ओमायक्रॉन विषाणूचा शोध लावणाऱ्या संशोधक गटातील प्रमुख. ओमायक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत असला, तरी सध्याची त्याची स्थिती घातक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सौम्य आजार आणि बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.

सध्या या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींचा तपशील गोळा केला असता, त्याचे परिणाम तीव्र असल्याचे दिसून आलेले नाही. ओमायक्रॉनबाबत आणखी दहा ते बारा दिवसांनी अधिक स्पष्ट चित्र होईल, पण सध्या तरी तो चिंताजनकनसल्याचेच दिसत आहे, असेही कोएट्झी म्हणाल्या.

कोणत्याही आजारांच्या लाटेमध्ये लहान मुले सर्वाधिक बाधित होतात. ओमायक्रॉनमुळे आत्तापर्यंत तरी लहान मुलांवर कोणताही दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. तरीही सर्व देशांतील केंद्रीय आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्याचा सल्ला कोएट्झी यांनी दिला. दक्षिण आफ्रिकेत श्वसनासंबंधित विकाराची कोणतीही शंका आल्यास आम्ही पहिल्यांदा चाचण्या करण्याचे नागरिकांना सांगत आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एकूण २३ रुग्ण

देशात मंगळवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसला तरी सोमवारी मुंबईत नोंद झालेल्या दोन रुग्णांमुळे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या २३ झाली आहे.

ल्ल मंगळवारी केंद्र सरकारने घाना आणि टांझानिया या देशांनाही ‘जोखीम देशांच्या’ यादीत स्थान दिले असून या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी आणि विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात ६,८२२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ५५८ दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या आहे. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ९५,०१४ आहे.

गेल्या २४ तासांत २२० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

परदेशांतून मुंबईत आलेल्या आणखी तिघांना करोना

जोखमीच्या देशांतून मुंबईत आलेल्या आणखी तीन प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबईत २३ प्रवासी आणि त्यांच्या सहवासातील नऊ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

आधीचा इशारा…

दक्षिण आफ्रिकेत गेल्या महिन्याच्या अखेरीस आढळलेला ओमायक्रॉन हा उत्परिवर्तित विषाणू डेल्टापेक्षाही अनेक पटींनी घातक असल्याचे सुरुवातीला मानले गेले. लस घेतलेल्यांनाही याच्या संसर्गाचा धोका असतो आणि तरुणांमध्ये त्याचा अधिक फैलाव होतो, असे अभ्यासकांनी म्हटले होते.

तरुण आणि ज्येष्ठांना लशीची वर्धक मात्रा दिल्यास भारतासारखे देश ओमायक्रॉनला थोपवू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 – अँजलिक कोएट्झी