मुंबई : पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरलेल्या आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरान मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. नियंत्रणात आलेली करोनाबाधित रुग्णांची संख्या आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी माथेरानला जाणे पसंत केले.

मुंबईच्या जवळ असलेले उत्तम पर्यटन स्थळ अशी माथेरानची ओळख आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला बहुसंख्य पर्यटक भेट देत असतात. करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर अनेक पर्यटकांनी माथेरानला धाव घेतली होती. वृक्षपल्लीचे दर्शन घडवत डोंगर माथ्यापर्यंत धावणारी माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल एक लाख ५४ हजारांहून अधिक पर्यटकांनी माथेरानच्या मिनी ट्रेनमधून सफर केली. त्यामुळे मध्य रेल्वेला एक कोटी १२ लाख रुपये महसूल मिळाला. त्याचबरोबर एप्रिल – ऑगस्ट २०२२ या कालावधीत १२ हजार ०७४ पार्सलची वाहतुकही करण्यात आली.

हेही वाचा : दसरा मेळाव्यावरून रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…”

त्यातून मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून एक कोटी १२ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
गेल्या वर्षी एप्रिल-ऑगस्ट २०२१ या काळात ५६ हजार ४३ हजार पर्यटकांनी मिनी ट्रेनमधून प्रवास केला होता. तर पाच हजार ३४१ पार्सलची वाहतूक करण्यात आली होती. यामुळे ३२ लाख ८६ हजार रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले होते. सध्या मिनी ट्रेनची माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर नेरळ ते अमन लाॅज मार्गावर २० किलोमीटरपर्यंत नवीन रुळांचे काम हाती घेण्यात आले असून अपघात होऊ नये यासाठी रुळाच्या बाजूला उपाययोजनाही करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण करून नेरळ – माथेरान दरम्यानच्या संपूर्ण मार्गावर डिसेंबर २०२२ पासून मिनी ट्रेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे