एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या तरुणीला अचानक ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर अश्लील संदेश आणि व्हिडीओ येऊ लागल्याने ती हैराण झाली होती. मोबाइल क्रमांक ओळखीचा नव्हता. तरीही पोलिसांनी मोबाइल क्रमांकावरून संबंधित तरुणाला शोधून काढून अटकही केली. मात्र आपला क्रमांक त्याच्याकडे कसा आला, याचा उलगडा झाला तेव्हा ती सर्द झाली.
ही तरुणी गोव्याला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या मोबाइलमधील शिल्लक संपली. त्यामुळे मैत्रिणीला फोन करण्यासाठी तिने तेथे फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाकडून मोबाइल घेतला. काही वेळानंतर या तरुणाने संबंधित मैत्रिणीला फोन करून, आपली मैत्रीण माझ्याकडे काही वस्तू विसरली आहे, असे सांगून तिचा क्रमांक मिळविला. हैदराबाद येथे कामानिमित्त गेलेल्या या तरुणाने तेथून या क्रमांकावर अश्लील संदेश, व्हिडिओ पाठविण्यास सुरुवात केली.
या तरुणीने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे, सुनील माने, संजय मोरे, हनुमंत जोशी आदींच्या पथकाने मोबाइल क्रमांकावरून शोध घेऊन मोहम्मद अझीम मोहम्मद पीर शेख (३५) याला वांद्रे कुर्ला संकुल येथील आयकर भवनसमोर अटक केली.
अँटॉप हिल येथील नुरा नगरात राहणारा शेख हा फ्रिज व एअरकंडिशन दुरुस्तीचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान,तरुणींनी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल फोन वापरताना काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One arrested for sending provocative messages on whatsapp
First published on: 20-04-2014 at 05:52 IST