मुंबई : युनानी डॉक्टर असल्याचे भासवणाऱ्या राजस्थानमधील टोळीने फसवणूक केलेल्या नऊ जणांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपींच्या बँक खात्यातील चार लाख रुपये गोठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
युनानी डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांच्या घरी जाऊन उपचाराच्या निमित्ताने एक टोळी फसवणूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. वडाळा येथील रहिवासी असलेल्या राजेश पाटील (६१) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फसवणूक व इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी पाटील यांची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली होती. मोहम्मद शेरू शेख मकसूद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (३९), मोहम्मद आसिफ मोह. निसार, वय २७ वर्षे व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ (४४) या आरोपींना अटक केली होती. ते सर्व जण राजस्थानमधील रहिवासी आहेत. त्याच टोळीने आतापर्यंत नऊ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा – अग्नीवीर होण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या केरळच्या तरुणीची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या
प्राथमिक तपासात राजेश पाटील यांच्यासह मायरोस सालियन यांची २७ लाख रुपयांची, गेव मेस्त्री यांची १७ लाख रुपयांची, फिरोज सिंदवा यांची आठ लाख ५० हजार रुपयांची, आलिन मेहता यांची १० लाख रुपयांची, अरुण मेहता यांची तीन लाख २० हजार रुपयांची, महावीर जैन यांची एक लाख ६१ हजार रुपयांची, सुषमा वारोट यांची ९ लाख ४० हजार रुपयांची व प्रकाश नाईक यांची आठ लाख रुपयांची अशी एकूण एक कोटी रुपयांची या टोळीने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा – मध्य रेल्वेच्या आरपीएफने ६६ प्रवाशांचे वाचवले प्राण
आरोपींची व्हॉट्सॲपवरील संभाषण व दूरध्वनीच्या माहितीवरून आणखी तक्रारदारांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्यांनी आरोपींना ओळखले आहे. अटक आरोपींपैकी मोहम्मद शेरू हाच सर्व तक्रारदारांच्या घरी डॉक्टर पटेल बनून गेला होता. याप्रकरणातील बहुसंख्य तक्रारदारांच्या शरिरातून पित्त काढण्याच्या नावाखाली अंगावर जखमा करून त्यावर छिद्र असलेली मेटल क्युबने (तुंबडी) लावली. त्यावेळी आरोपींनी तक्रारदाराचे रक्त साठवून झालेल्या व्रणावर रसायन टाकले. त्यावेळी तेथील रंग पिवळा झाल्याचे दाखवून पैसे उकळले. आरोपींच्या बँक खात्यामधील ४ लाख रुपये गोठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.