मुंबई : २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागता होता. ही बाब लक्षात घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि पहिली परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – ‘महारेरा’च्या कारवाईच्या बडग्यानंतर विकासकांना जाग
करोनामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवा करण्याबरोबरच महामारीचाही सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेकांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाले होते. याचा परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी एमबीबीएसच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले होते. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोनामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची एक संधी मिळणार आहे. ही संधी फक्त एकदाच दिली जाणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे पदवी वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक शंभु शरण कुमार यांनी स्पष्ट केले.