लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका शिपायाला एका भामट्याने दीड लाख रुपयाला ऑनलाइन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. शिपायाने केलेल्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वरळी येथे राहणारे तक्रारदार पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना वारंवार एका बँकेतून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन येत होते. मात्र गरज नसल्याने त्यांनी अनेकदा संबंधित कर्मचाऱ्याला नकार दिला होता. मात्र त्यानंतरही इतर बँकांमधून त्यांना फोन येतच होते. अखेर मित्राच्या सल्ल्याने त्यांनी एक क्रेडिट कार्ड घेतले. मात्र गरज नसल्याने अनेक महिने त्यांनी तो कार्यान्वित केले नव्हते.

आणखी वाचा- गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक, १० जणांविरोधात गुन्हा

मात्र महिन्याभरापूर्वी ते कामावर असताना त्यांना एक फोन आला. संबंधित इसमाने बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्याकडे या कार्डची माहिती मागितली. तक्रारदारांनी संबंधित इसमाला कार्ड सुरू करण्याची विनंती केली. यावेळी आरोपीने त्यांच्याकडे कार्डची माहिती आणि मोबाइलवर आलेले ओटीपी मागून घेतले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख १९ हजार रुपयांची खरेदी झाल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.