‘म्हाडा’ने मुंबईतील १२४४ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपण्यास अवघे चार दिवस उरले असताना यंदा केवळ २८ हजार अर्ज अ‍ॅक्सिस बँकेत दाखल झाले आहेत. त्यामुळे एरवी चातकासारखी ‘म्हाडा’च्या घरांची वाट पाहणाऱ्या अर्जदारांनी यंदा ‘म्हाडा’चा नाद सोडल्याचे चित्र आहे. सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी २६ मे रोजी जाहीर होणार असून त्याबाबतची सूचना यंदा प्रथमच ‘एसएमएस’च्या माध्यमातून अर्जदारांना दिली जाणार आहे.
‘म्हाडा’ने यंदा १२५९ घरांसाठी जाहिरात काढली. त्यात बांधून तयार असलेल्या २५१ घरांचा समावेश आहे. ५७ घरांचे बांधकाम झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे तर बांधकाम सुरू असलेल्या ९५१ घरांचा समावेश होता. पण आता जाहिरातीनंतर पुन्हा एकदा सोडतीमधील घरांच्या संख्येत बदल झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या संख्येत १५ घरांची कपात झाली असून आता ती संख्या ९३६ वर आली आहे. त्यामुळे यंदाची सोडत १२४४ घरांची असणार आहे. ‘म्हाडा’च्या घरांबाबत यंदा चढय़ा दराची टीका झाली. तसेच जुन्या सोडतीमधील घरांचा ताबा देण्यास होत असलेल्या विलंबामुळे यशस्वी अर्जदारांची होत असलेले हालही प्रसिद्धीच्या झोतात राहिले. यामुळे ‘म्हाडा’च्या घरांबाबत आकर्षणाऐवजी लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.
सोडतीच्या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी माजी उपलोकायुक्त सुरेशकुमार, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे सचिव राजेश अगरवाल आणि आयआयटीतील प्राध्यापक बी. बी. मेश्राम अशी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीची बैठक झाली. त्यात सोडतीच्या वेळापत्रकावर चर्चा झाली आणि सॉफ्टवेअरचा आढावा घेण्यात आला.
२१ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अनामत रकमेसह अ‍ॅक्सिस बँकेत अर्ज स्वीकारले जातील. बँकेकडून ही सारी माहिती २४ मे रोजी ‘म्हाडा’कडे येईल. अर्जाची छाननी करून सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी २६ मे रोजी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर जाहीर होईल. याबाबतची सूचना ‘एसएमएस’द्वारे अर्जदारांना देण्यात येईल. आपल्या नाव वा इतर तपशीलात काही दुरुस्ती असेल वा यादीत नाव नसेल तर अर्जदारांनी २८ मे पर्यंत ‘म्हाडा’शी संपर्क साधावा. त्यानंतर २८ मे रोजी अंतिम यादी जाहीर होईल. ३१ मे रोजी सोडत निघेल.