तंबाखू व्यसनमुक्तीबाबत अद्याप उदासीनता

मुंबई : धूम्रपान करणाऱ्या केवळ २४ टक्के बालकांना व्यसन सोडण्याची इच्छा असून १९ टक्के बालकांनी गेल्या वर्षभरात व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न  केला. यातील सुमारे ५० टक्के बालकांना धूम्रपान आरोग्याला हानिकारक असल्याची जाणीव असल्यामुळे सोडण्याची इच्छा आहे. मात्र तरीही तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मदतवाहिनीवर संपर्क साधून मदत घेणाऱ्या बालकांचे प्रमाण मात्र अवघे सहा टक्के आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या बालकांना समुपदेशनासह सर्व मदत करण्यासाठी केंद्रीय मदतवाहिनी २०१८ पासून चालविली जाते. या मदतवाहिनीला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणात आढळले आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन सोडण्यासाठी मदतवाहिनी असल्याची माहिती सर्वेक्षण केलेल्या बालकांपैकी सुमारे १९ टक्के बालकांनाच आहे. मुलींमध्ये मात्र या मदतवाहिनीबाबत फारशी जागृती नसल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मदतवाहिनीबाबत माहिती असल्याचे प्रमाण सारखेच आहे.

शहरामधील मुलांची संख्या अधिक

 धूम्रपानाचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या बालकांचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरामध्ये अधिक आहे. शहरांतील सुमारे ३५ टक्के, तर ग्रामीण भागातील सुमारे १० टक्के बालकांना धूम्रपानाचे व्यसन सोडायचे असल्याचे या सर्वेक्षणात नमूद केले आहे. तसेच मागील वर्षभरात व्यसन सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील बालकांच्या तुलनेत शहरातील बालकांचे प्रमाण जास्त आहे. अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन सोडण्याची इच्छा सुमारे १५ टक्के बालकांना आहे. यातही शहरी भागातील सुमारे १७ टक्के तर ग्रामीणमधील सुमारे ११ टक्के बालकांचा समावेश आहे.

मुलींचा प्रतिसाद कमी

मदतवाहिनीची मदत घेणाऱ्या बालकांचे प्रमाण फार कमी आहे. सुमारे सहा टक्के बालकांनी याचा वापर केला आहे. त्यातही मुलांचे प्रमाण सात टक्के तर मुलींचे प्रमाण पाच टक्के आहे. विशेष म्हणजे व्यसन सोडण्याची इच्छा शहरातील बालकांची जास्त असूनही याचा वापर मात्र, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक झाल्याचे आढळले आहे. शहरात सुमारे ५ टक्के तर ग्रामीण भागात ७ टक्के बालकांनी या मदतवाहिनीचा वापर केला आहे. आरोग्यासाठी व्यसन सोडण्याची इच्छा आरोग्यासाठी तंबाखूचे व्यसन घातक असल्यामुळे ते सोडण्याची सुमारे ५० टक्के बालकांना इच्छा आहे. धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांमध्ये सुमारे २२ टक्के बालकांना परवडत नसल्यामुळे तर १४ टक्के बालकांना पालकांना आवडत नाही म्हणून सवय मोडायची आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांपैकी सुमारे १३ टक्के बालकांना हे व्यसन पालकांना आवडत नसल्याने सोडायचे आहे.

मदतवाहिनी उपलब्ध असली तरी त्यावरून समुपदेशनासह पाठपुरावा होतोच असे नाही. यातील काही बालकांना पालकांच्या दबावाखाली व्यसन सोडायचे आहे, तर काही बालकांनी व्यसन सोडण्याचे प्रयत्नही केले आहेत. परंतु अशा बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय मदतवाहिनीपेक्षा विभागीय मदतवाहिनी असल्यास अधिक फायदेशीर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. राजेश दीक्षित,  संचालक, टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग एपिडेमियोलॉजी केंद्र