मुंबई : दहिसर पूर्व येथील आनंदनगर परिसरात आनंदवन उद्यानात पालिकेने ‘खुले वाचनालय’ सुरू केले आहे. या वाचनालयात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटाला आवडतील अशा प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या उद्यानातील ‘खुले वाचनालय’ या उपक्रमांतर्गत दहिसरच्या उद्यानात ‘मिशन ग्रीन मुंबई’ यांच्या सहकार्याने खुले वाचनालय सुरू करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानातील खुल्या वाचनालयाच्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत विविध उद्यानात १९ खुली वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्याकरिता मुंबई प्रोजेक्ट, गोदरेज, मेघाश्रय अशा अनेक सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली आहे. विसावे खुले वाचनालय सुरू करण्यासाठी मिशन ग्रीन मुंबईचे सुबरजीत मुखर्जी यांनी सहकार्य केल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. तसेच उद्यानात फिरायला येणारे नागरिक आपल्या आवडीची पुस्तके इथे येऊन वाचू शकतात. शालेय विद्यार्थी देखील या वाचनालयात येऊन अभ्यासही करू शकतात. अद्याप दहिसर विभागात अशा प्रकारची सुविधा उद्यानात उपलब्ध नव्हती.